अमरावती: पुण्याच्या येरवडा जेलमध्ये झालेल्या मैत्रीतून कोयत्या गॅंगच्या सदस्यांनी थेट अमरावती गाठत मोझरी व शिवणगाव येथील पेट्रोलपंपावर जबरी चोरी केली. तिवसा व नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या त्या जबरी चोरीप्रकरणी, शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी स्थानिक तिघांना अटक केली असून, त्यांच्या कबुलीतून कोयता गॅंगमधील तिघांची नावे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. आरोपींनी दोन्ही गुन्हयाची कबुली दिली आहे.
अटक आरोपींमध्ये राहूल लक्ष्मण मूधोळकर (२१, रा. मंजूळामातानगर, गुरुकुंज मोझरी), गौरव महादेवराव पाटील (२३, गुरूदेवनगर) व अनिकेत बाळू ठाकरे (२०, मोझरी) यांचा समावेश आहे. त्यांच्या कबुलीतून पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱ्या व कोयता गॅंगचे सदस्य असलेल्या आकाश शेंडगे, विकास शेंडगे, प्रतिक माने व राजेश उर्फ राज या आरोपींची नावे उघड झाली आहेत. आरोपींनी गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांत २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तर, तिवसा पोलिसांत देखील त्याच दिवशी पहाटे गुन्हा दाखल आहे.
शिवणगाव, मोझरी येथील पेट्रोलपंप लक्ष्यशिवणगाव येथील भारत पेट्रोलपंपावर तेथीलच शुभम पांडे व निरंजन डिवरे हे २८ ला रात्री ड्युटीवर असताना रात्री ११.३५ च्या सुमारास चार इसम दोन दुचाकीवर पेट्रोल भरण्याकरिता आले. त्यांनी पेट्रोल भरून ५०० रुपये दिले. त्यानंतर शुभम पांडे हा पैसे परत करत असताना आरोपींनी त्याच्या हातातील ७९०० रुपये जबरीने हिसकावले. चेहऱ्याला रूमाल बांधलेले ते चौघेही पळून गेले. यात नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याच आरोपींनी मोझरीतील पेट्रोल पंपावर सशस्त्र लूटमार केली. तेथील किशोर गुल्हाने यांना मारहाण करून त्यांच्याकडील ९ हजार रुपये रोख व मोबाईल हिसकावला.