पोलिसांचा प्रामाणिकपणा : रहाटगाव येथील घटनानांदगाव पेठ : दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग शुक्रवारी मूळ मालकाला परत करून प्रामाणिकतेचा अनोखा परिचय दिला.माहितीनुसार, शुक्रवारी नांदगाव पेठ पोलीसचे जमादार श्रीकांत मेश्राम व पोलीस शिपाई धीरज यादव हे दोघे रहाटगाव येथे नोटीस बजावण्याकरिता बसस्टँडवरील एका बंद पानटपरीवर लेडीज बॅग बेवारस स्थितीत आढळून आली. श्रीकांत व धीरज यांनी ही बॅग तपासली. त्यामध्ये एक मंगळसूत्र, कानातील टॉप्स, नथनी व बांगड्या असे ६० हजार रूपयांचे दागिने आढळले. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांना हकीकत ऐकविली. चाटे यांनी ताबडतोब पावतीच्या आधारे मूळ मालक पपिता दिलीप रिसोडकर (केळवद, जि.बुलडाणा) यांच्याशी संपर्क केला व त्यांना ठाण्यात बोलावून घेतले.शहानिशा करून सर्व दागिने रिसोडकर दाम्पत्याला परत केले. आजच्या स्वार्थी युगातही प्रामाणिकपणा जिवंत आहे, यावर या दाम्पत्याला विश्वास बसत नव्हता. रिसोडकर दाम्पत्याने नापोका श्रीकांत मेश्राम व पोकाँ धीरज यादव यांचे आभार मानले. या प्रामाणिकपणाची माहिती इतरांना मिळताच सर्वांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र्र चाटे, एएसआय चंद्रकांत वानखडे, हेकॉ राजेंद्र काळे, पोकाँ, जगदीश शिरपुरे, राजेश ढोके, रवीकुमार सोनवणे, आशिष अढाऊ, मपोकाँ मंगला परिहार उपस्थित होते. (वार्ताहर)
दागिन्यांची बॅग केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 12:16 AM