लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निर्मितीपासूनच उपसला न गेलेल्या वडाळी तलावातील गाळ काढण्यासाठी हजारो हात शनिवारी सकाळी ‘साथी हात बढाना’ या भूमिकेत होते. महापालिका आयुक्तांच्या महाश्रमदान या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद लाभला. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व्हावे व शहर सौंदर्यात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक तलावाचा जलस्तर वाढावा, या उद्देशाने रविवारीदेखील महाश्रमदान होणार आहे.महानगराची दिवसेंदिवस खोल जात असलेली भूजल पातळी या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी व रविवारी महाश्रमदानाचा संकल्प केला. शहरालगतचा वडाळी तलाव हा यंदाच्या दुष्काळात कोरडा झाला. यंदाच्या पावसाळ्यात या तलावाचा जलस्तर वाढावा, ही संधी साधून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांसह नागरिकांचे हजारो हात सकाळपासून कुदळ, पावडे व घमीले घेऊन राबले.१३ हेक्टर क्षेत्रात विस्तार असलेल्या या तलावातील अनेक वर्षांपासून साठलेला गाळ काढण्यासाठी महापालिकेने दोन जेसीबी उपलब्ध केले तसेच इतर ११ असे १३ जेसीबी आणि गाळ वाहून नेण्यासाठी २० डम्पर येथे लागले होते. तलावाची हद्द पांढºया रेषेने निश्चित करून त्यानुसार खोदकामाचे निर्देश देण्यात आले आहेत. बहुतांश महापालिका कर्मचाºयांनी खोदलेली माती मानवी साखळीने धरणाच्या बांधावर टाकण्यात आली. काही जणांनी धरण परिसरातील कचरा गोळा करण्याची मोहीम राबविली. श्रमदानातून मिळणारा आनंद त्यांच्या चेहºयावर झळकत होता. एकूण १६८ ट्रक गाळ येथून शनिवारी काढण्यात आला. रविवारच्या श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.श्रमदानात अनेक व्हीआयपींचे हात सरसावलेमहाश्रमदानात पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अनंत गुढे, रावसाहेब शेखावत, उपमहापौर संध्या टिकले, महापालिका आयुक्त संजय निपाणे, स्थायी समिती सभापती बाळू भुयार, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, नगरसेवक सुनील काळे, विलास इंगोले, उपायुक्त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी श्रमदान केले. वडाळी तलावासाठी श्रमदान, परिसरात जनजागृती वा इतर कामे करण्याचे संकल्पपत्र महाश्रमदानात सहभागी नागरिकांकडून भरून घेण्यात आले.* महापालिकेने महाश्रमदानाच्या उपक्रमाचे काटेकोर नियोजन केले होते. या उपक्रमासाठी जेसीबी, माती वाहून नेणारे डम्पर मिळवण्यासह तेथे येणाºया व्हीआयपींसाठी पेन्डॉल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोख होती. याशिवाय कुणी काय करावे, याच्या सूचना ध्वनिक्षेपकातून दिल्या जात होत्या.मनपा कंत्राटदार संघटना, क्रेडाई, मजीप्रा कंत्राटदार, नीलेश चौरसिया, विजय खंडेलवाल, रूपचंद खंडेलवाल, रोडे कंत्राटदार, जुजर सैफी आदींनी महाश्रमदानात यंत्रसामग्र उपलब्ध करण्यात मोलाचे योगदान दिले. माजी महापौर अशोक डोंगरे यांनी थंडगार ताकाची व्यवस्था केली होती.
महापालिकाद्वारे महाश्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:53 AM
निर्मितीपासूनच उपसला न गेलेल्या वडाळी तलावातील गाळ काढण्यासाठी हजारो हात शनिवारी सकाळी ‘साथी हात बढाना’ या भूमिकेत होते. महापालिका आयुक्तांच्या महाश्रमदान या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद लाभला. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व्हावे व शहर सौंदर्यात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक तलावाचा जलस्तर वाढावा, या उद्देशाने रविवारीदेखील महाश्रमदान होणार आहे.
ठळक मुद्दे‘साथी हात बढाना’। वडाळी तलावातील उपसला १६८ ट्रक गाळ, हजारो हातांचा सहभाग