मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडू व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यातील वाद आता जिल्ह्याला परिचीत झाला आहे. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच शाब्दीक धुसफूस पाहायला मिळते. आमदार कडू यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी, बच्चू कडू यांचे स्वत:वरचे नियंत्रण गेले आहे. त्यांनी स्वत:ला सांभाळायला पाहिजे, अशी बोचरी टीका राणा यांनी केली होती. आता राणा यांच्या दिवाळी किराणा वाटपावरुन बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला नाव न घेता चांगलंच सुनावलं आहे.
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) एक लाख कुटुंबांमध्ये किराण्याचे वितरण करणार आहेत. अमरावती शहरासह जिल्ह्यातील विविध भागात गरिबांच्या घरी त्यांच्याकडून किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यावरुन, आमदार कडू यांनी टीका केली आहे. आधी खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, असे म्हणत कडू यांनी राणा दाम्पत्यांविरुद्ध बोचरी टीका केली.
काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे, अशा महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवाल बच्चू कडूंनी विचारला आहे. यावेळी कोणाचेही नाव त्यांनी घेतले नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोक राणा दाम्पत्याकडे होता.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या अघिकाराचं प:तन
गोरगरीबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा. लोकशाहीचं पतन करायचं. राजकारणाची ऐशी की तैशी करायची,असे नेते आपल्यात कमी नाहीत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांनी अप्रत्यक्ष राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.
१ लाख कुटुंबांना किराणा वाटप
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मेळघाटातील गोर-गरीब आणि गरजूंच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करत आहेत. मेळघाटातील १ लाख गरीब कुटुंबियांना आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून मोफत किराणा वाटप सुरू आहे. ‘किराणा किट पॅकिंगचे काम युद्धस्तरावर सुरू असून आदिवासीसंह अमरावतीतील १ लाख गरजू कुटुंबियांच्या घरी मोफत किराणा पोहचविण्यात येत आहे.