अमरावती : कृषी विभागाच्या अनेक योजनांसाठी आता एकच अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ‘महाडीबीटी’ या पोर्टलवर करावा लागतो. यासाठीची मुदत ३१ डिसेंबरला संपुष्टात आलेली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची नोंदणी व्हायची असल्याने शासनाने ही मुदत ११ जानेवारीपर्यंत वाढविल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज केल्यापसून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यापर्यत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली व या प्रणालीद्वारे योजना निवडीचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. यासाठी शेती निगडित बाबींसाठी अर्ज करायचा आहे. महाडीबीटी संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा, शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅबटॉप, सामुदायिक सेवा केंद्र व ग्रामपंचायतींतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावरून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक हा महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्यांना नोंदणी करता येणार आहे. अशा अर्जदारांना अनुदान वितरणापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करावा लागणर आहे. त्याशिवाय त्यांना पुढील अनुदान वितरण करण्यात येणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.
बॉक्स
सर्व प्रक्रिया ऑनलाईन
पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करणे आदी सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन होणार आहेत. मुदतवाढीपुर्वी ज्यांनी माहिती भरलेली आहे, त्यांना पुन्हा माहिती भरण्याची आवश्यकता नाही. ११ जानेवारीपर्यंत प्राप्त अर्ज ऑनलाईन लॉटरीसाठी पात्र ठरणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.