पुलवामा, शेतकरी आंदोलनातील शहिदांना आदरांजली, किसान संघर्ष समन्वय समिती करणार गावपातळीवर जागृती
चांदूर रेल्वे : दिल्ली येथील तीन शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी सुरू असलेले शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी अमरावती येथे महापंचायतचे नियोजन करण्यात येणार आहे. शेतकरी आंदोलन प्रत्येक गावपातळीवर नेत जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ १८ फेब्रुवारीच्या रेल रोको आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत.
चांदूर रेल्वे शहरात हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने हा संकल्प जाहीर केला. रविवारी याप्रसंगीपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद ४० जवान व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात दगावलेल्या १५० शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिवसा किसान सभेचे महादेव गारपवार होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजेश निंबर्ते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मेंढे, आपचे विदर्भ संघटक मंत्री नितीन गवळी,
अ.भा. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष देविदास राऊत, राज्य किसान सभेचे अध्यक्ष विजय रोडगे, महादेव गारपवार यांनी विचार व्यक्त केले. राज्यस्तरीय सदस्य विनोद जोशी यांनी संचालन केले. कार्यक्रमाला शिवसेना तालुका उपप्रमुख गजानन बोबडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र वाहणे, मोरेश्वर राजुरकर, राजेंद्र कडुकार, रमेश सोळंके, यादव नारनवरे, देविदास वानखडे, नवीन खंदेडिया, गोविंद ढेंगे यांसह अनेकांची उपस्थिती होती.