चौकशी होण्याची शक्यता : धर्मदाय आयुक्त कार्यालयाने घेतली दखलअमरावती : अंबा देवी व एकवीरा देवी संस्थानातर्फे पत्रिका वाटून महाप्रसाद देत असल्यामुळे हजारो भाविक महाप्रसादापासून वंचित राहिलेत. 'लोकमत'च्या या वृत्ताला हजारो भाविकांनी समर्थन दर्शवून संस्थानाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात दखल घेत अमरावतीच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाने मुंबई येथील धर्मदाय आयुक्तांना ‘लोकमत’ वृत्ताचे कात्रण पाठविले आहे. त्यामुळे याबाबत आता चौकशी होण्याची शक्यता आहे. विदर्भाचे दैवत असणाऱ्या अंबादेवी व एकविरा देवी मंदिर संस्थानात दरवर्षी नवरात्रोत्सवातील नऊ दिवस राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे अलोट गर्दी उसळते. नवरात्रोत्सवात हजारो भाविक दानपेटीत लाखो रूपयांचे दान सुध्दा करते. तसेच संस्थानाला वार्षिक २ कोटींच्या जवळपास दानसुध्दा मिळते. मात्र, तरीसुध्दा मुख्य महाप्रसादाच्या कार्यक्रमात संस्थानातर्फे मोजक्या भाविकांनाच पत्रिका वाटप करून निमंत्रण देण्यात येते. ही बाब कितपत योग्य आहे. असा सवाल आता भाविकांनी विचारला आहे. संस्थानाकडून मंदिरात दानपेटी लावण्यात आली आहे. त्या दानपेटीत बहूतांश भाविक दान सुध्दा करतात. मात्र, महाप्रसाद केवळ मोजक्याच ओळखीतील दानदात्यांना का असा प्रश्न या निमीत्त्याने उपस्थित झाला आहे. पत्रिका वाटप करून निमंत्रण दिल्यामुळे हजारो भाविकांना महाप्रसादापासून वंचीत राहावे लागले आहे. अनेकांना तर महाप्रसादाच्या प्रवेशद्वारापासूनच परत पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात प्रकाशित केलेल्या लोकमतने वृत्ताला हजारो भाविकांनी समर्थन दर्शवीले आहे. संस्थाच्या मनमानी कारभाराची चौकशी करून महाप्रसाद सर्वासाठी खुला करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. आता हे वृत्त अमरावती येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत मुंबई येथील राज्य शासनाच्या धर्मदाय आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे.
महाप्रसाद प्रकरण, मुंबईच्या धर्मदाय आयुक्तांकडे
By admin | Published: October 28, 2015 12:32 AM