गजानन नानोटकर
पुसला - आजही तो दिवस आठवला की अंगावर शहारे येतात. तो दिवस आजही पुसलावासीयांच्या स्मरणात आहे. तो दिवस म्हणजे ३० जुलै १९९१. या महापुराला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या महापुराने पुसला परिसरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती, तर नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे महापुराने २०४ नागरिकांचा बळी गेला होता.
मोठ्या लोकसंख्येचे गाव असलेल्या पुसला गावाच्या मध्य भागातून शक्ती नदी वाहते. कदाचित पुसलावासीयांनी कधी विचारही केला नसेल की पुसला गावावर नैसर्गिक संकट ओढावेल. २९ जुलै १९९१ रोजी एकाकी आभाळ फाटले. रात्रभर चाललेल्या संततधार पावसाने गावातून वाहणाऱ्या शक्ती नदीला एकाकी पूर आला व पाहतापाहता पुराने रोद्र रूप धारण करीत गावाला वेढले. या पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरे वाहून गेली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यावेळी गावात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. अनेकांची घरे वाहून गेल्याने गावातील लोकप्रतिनिधी , युवा संघटना मदतीकरिता सरसावल्या होत्या. नागरिकांची शाळेत राहण्याची व्यवस्था करून साधनसामग्री पुरविण्यात आली होती.
याच दिवशी पुसला गावाच्या १४ कि.मी. अंतरावर असलेल्या नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे नदीला पूर आल्याने या गावात दोनशेच्या वर बळी गेले होते व मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती.