अमरावती - भीमा कोरेगाव येथील आंदोलनानंतर संघटनांनी केलेले बंदचे आवाहन यशस्वी ठरले आहे. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. सुमारे दहा वाजता सर्व तालुका मुख्यालयापर्यंत पोहचणारे प्रमुख रस्ते जाम करण्यात आले. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळल्याने चित्र होते. अनेक आगारात एसटीबसेस आगारात जमा झाल्या आहेत. आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून बाजारपेठा बंद केल्या. सर्व तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आल्या.
अमरावती शहरातील विविध भागात जाळपोळीच्या घटना उघडकीस आल्या. सकाळी दहा वाजता जुण्या बायपासवरील अनेक वस्त्यांच्या रस्त्यावर बंदसाठी जाळपोळ करण्यात आली. शहरातील ईर्वीन चौकात अनेक संघटनांनी एकत्रित निषेध सभा घेतली. येथे पाच हजार लोकांची उपस्थिती असल्याची प्राथमिक माहिती आहे. युवकांनी मोटार सायकल रॅली काढून दुकाने बंद करण्याचासाठी पुढाकार घेतला. बहुतांश दुकाने बंद होती. बंद यशस्वी व्हावा यासाठी काही ठिकाणी साहित्याची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आल्या.
नागपूर महामार्गावरील तिवसा शहर कडकडीत बंद पाळण्यात आल्या. मंगळवारी येथे मुख्यमंत्री व सरसंघचालकांचा पुतळा जाळण्यात आला होता. ती धग बुधवारी कायम होती. दर्यापूर शहरातून बाहेर जाणा-या सर्व मार्गावर वाहतूक अवरुद्ध करण्यात आली. येथे बाजारपेठ बंद करताना दुकानातील साहित्याची फेकाफेक क रण्यात आली. तर शाळांवर दगडफेकीच्या घटना उघडकीस आली. अचलपूर-परतवाडा शहर बंद करण्यात आले. येथील सर्व शाळाना सुटी देण्यात आली. मिल स्टॉप वर चक्का जाम करण्यात आला. जुळया शहरातील सर्व बाजारपेठा बंद करण्यासाठी युवकांनी रॅली काढली. मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, येवदा, अंजनगाव सुर्जी सह अनेक गावांत वाहतूक ठप्प करण्यासाठी टायर जाळण्यात आले. धामणगाव शहर वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात बंद पाळण्यात आला. धामणगाव रेल्वे शहरात गुरुवारी बंद पाळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर अंजनगाव शहरात एका मुस्लिम युवकास मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.