अमरावती: काँग्रेसचे राजकारण गांधी परिवारासमोर जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला. भाजपमध्ये वंशवाद नाही. मात्र वंशवाद मुळात फोफावला असेल, तर तो केवळ गांधी, पवार कुटुंबामुळेच, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. अमरावतीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मौनीबाबा अशी संभावना करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
शेजारील राष्ट्राच्या हल्ल्याविरुद्ध चकार शब्द न काढणाऱ्या पक्षाला देशाने हद्दपार करून राष्ट्रहित जोपासणाºया नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून राष्ट्रवाद मजबूत केल्याचा दावा शहा यांनी के ला. ३७० कलम हटविल्यास ‘खून की नदिया बहेगी’ अशी धमकी दिली जात होती. मात्र, प्रत्यक्षात रक्ताचा एक थेंब न पडता ते कलम हटविल्याचे शहा म्हणाले. महाराष्ट्रातील तत्कालीन मंत्र्याने ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला. अवघे नऊ हजार कोटी रुपये खर्च करून देवेंद्र फडवणीस सरकारने पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली.
मेळघाटात राहणाऱ्या आदिवासींसह सर्व समाजाचे हित जोपासण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र व राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन समान न्याय दिल्याचेही ते म्हणाले. १५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करीत मोदी सरकारने सहा वर्षांच्या काळात शेवटच्या घटकांपर्यंत योजना व त्यांचा लाभ पोहोचविल्याचा दावा केला. मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तथा भाजप-सेना युतीचे उमेदवार उपस्थित होते.