लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर पाच वर्षांत एकदाच येणारा निवडणुकीचा हंगाम अन् वर्षातून एकदाच येणारा सोयाबीन कापणी व काढणीचा हंगाम यावर्षी एकाच वेळी आला आहे. परिणामी राजकारणी व शेतकरी अशा दोघांनाही आपआपली कामे उरकविण्यासाठी माणसांची गर्दी जमविताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोेचली आहे. सर्वच उमेदवार आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार व मतदारांच्या भेटीगाठीत व्यस्त आहेत. पण, यावर्षी सोयाबीन काढणी आणि निवडणूक प्रचार एकाच वेळी आल्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी दुर्मीळ होत आहेत. यामुळे दिवसऐवजी रात्रीच्या वेळी शेतकरी, शेतमजूर महिला-पुरुष मतदारांना गाठताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत. दरम्यान, नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. त्याचबरोबर लहान-मोठे बंधारे तलाव तुडुंब भरले आहेत. सोयाबीन पीक आता कापणी व काढणीला आले आहे. पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव अजून किती गगनाला भिडणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. अगोदरच मजुरांची प्रचंड ओठताण होता असताना दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका नेमक्या याच काळात आल्या आहेत. अशाच आता आठही मतदारसंघात विधानसभेचा प्रचारही जोरात सुरू झाला आहे.प्रचाराचा वेग वाढला असून विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या सभेची शोभा वाढण्यासाठी ग्रामीण भागात विशेषता शेतकरी-शेतमजूर या वगार्ला घेऊन जावे लागत आहे. त्यासाठी विविध पक्षातील राजकारणी मंडळी या वर्गावर डोळा ठेवून आहे. कारण जशा सभा लागतील तसे गावागावात गाड्या पाठवून या मंडळींना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र वर्षातून येणारा सोयाबीन काढणीचा काळ शेतकरी शेतमजूर यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. नेमका तोच कालावधी आला आहे. हाता तोंडाशी आलेला एवढी सुगीचा हंगाम वाया गेला तर पूर्ण वर्षभर आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.दिवसा गावखेड्यांमध्ये शुकशुकाटसध्या पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा पारा तापत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. ग्रामीण भागात सध्या सोयाबीन, ज्वारी कापणी व काढणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे बहुतांश गावांतील शेतकरी व शेतमजूर दिवसभर शेतात राबत आहेत. परिणामी गावखेड्यांमध्ये दिवसा कुणीही नागरिक सहसा भेट नाही. परिणामी उमेदवारांचे दिवसा असलेले दौरे निरुपयोगी ठरत असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Election 2019 ; निवडणुकीची लगबग अन् सोयाबीन सवंगणी एकाचवेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:00 AM
पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव अजून किती गगनाला भिडणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.
ठळक मुद्देप्रचाराला केवळ आठ दिवस : ग्रामीण भागात गर्दी जमविण्यासाठी उमेदवारांची कसरत