लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणूक प्रचार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रचारात वेग आणला असून, निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठी, कॉर्नर सभा आणि समाजाच्या बैठकींना प्राधान्य देण्यात येत आहे. मतदान २१ ऑक्टोबर रोजी आहे.जिल्ह्यात आठही मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात डिजिटल वाहने, आश्वासनांची खैरात, देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रचारासाठी आता अवघे काही तास उरले असल्याने उमेदवारांनी त्यानुसार नियोजन चालविले आहे. निवडणूक आयोगानुसार, १९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार आहेत.यंदा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी फारच कमी कालावधी मिळाल्याने बहुतांश उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचता आले नसल्याची खंत आतापासून व्यक्त होत आहे. अद्यापही काही गावांमध्ये उमेदवार पोहोचलेले नाहीत. त्यामुळे प्रचारातून सुटलेल्या गावांमध्ये १९ नंतर छुप्या प्रचाराचे नियोजन उमेदवारांनी आखले आहे. १९ ऑक्टोबर पूर्वी अशा गावांमध्ये पोहोचून मतदारांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उमेदवारांना स्थानिक नेत्यांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. दुर्गम, अतिदुर्गम, सीमेलगतच्या गावांमध्ये उमेदवार पोहोचले नाहीत. त्यामुळे निदान मतदार यादीच्या रूपाने तरी प्रचार साहित्य, उमेदवार-पक्षाचे नाव मतदारापर्यंत पोहचविण्याची जणू परीक्षा ठरणार आहे. शहरी मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहचणे कठीण नाही. ग्रामीण भागात पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.उमेदवारांनी घेतला प्रचारात वेगमतदारांच्या भेटीगाठी, कॉर्नर सभांना प्राधान्यसायंकाळी प्रचार रॅली, कॉर्नर बैठकींना पसंतीआठही मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी दिवसा प्रचारासाठी नकारघंटा चालविली आहे. कारण अलीकडे शेतीची कामे जोरात सुरू असल्याने उमेदवार गावात पोहोचले की, मतदार घरी मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी प्रचारासाठी सायंकाळी पसंती दर्शविली. प्रचार सभा, रॅली, कार्नर बैठकी अथवा रोड शो हे सायंकाळी आयोजन करण्यात येत आहेत.
Maharashtra Election 2019 ; आज सायंकाळी प्रचारतोफा थंडावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM