बडनेरा (अमरावती) : सोलापूर विभागातील कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान सुरू असणाऱ्या कामामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेस तीन दिवस रद्द असणार आहे, तर काही गाड्या वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून मिळाली आहे. विदर्भातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झेलावा लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाने कामासाठी काही गाड्या रद्द, तर काही वळविण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये विदर्भातून पुण्याकडे जाणारी गर्दीची महाराष्ट्र एक्स्प्रेस २१ ते २३ जानेवारी दरम्यान ये-जा रद्द असणार आहे. १९ जानेवारी रोजी सुटणारी पुणे-नागपूर ही गाडी लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे पुण्याला पोहोचणार आहे. २२११८ पुणे-अमरावती गाडी १९ जानेवारी रोजी मनमाड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी मार्गे पुण्याला जाणार आहे. २२ जानेवारी रोजी सुटणारी १२१३० हावडा-पुणे-नागपूर ही गाडी बल्लारशाह, काजीपेट, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे पुण्याला पोहोचेल. २२१२३ पुणे-अजनी ही २० जानेवारीला सुटणारी गाडी लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे अजनीला पोहोचेल. २२१२४ अजनी-पुणे गाडी २४ जानेवारी रोजी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे पुण्याला पोहोचेल. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची यादरम्यान प्रचंड गैरसोय होणार आहे.
बऱ्याच रेल्वेगाड्या लेटलतीफ
गीतांजली एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, आजाद हिंद एक्स्प्रेस यासह इतरही लांब पल्ल्याच्या गाड्या गेल्या काही दिवसांपासून बडनेरा रेल्वेस्थानकावर उशिराने पोहोचत आहेत. प्रवाशांना अनेक तास गाड्यांची वाट पाहत रेल्वेस्थानकावर थांबावे लागत आहे. उत्तर भारतात धुक्याचे प्रमाण वाढल्यामुळे गाड्या उशिराने धावत असल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून दिले जात आहे. गाड्या रद्द होणे व उशिराने धावणे ही बाब गेल्या वर्षभरात नित्याचीच झाली आहे. प्रवाशांना मात्र सारखा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.