- गणेश वासनिक अमरावती - सन २०२३ च्या तुकडीतील परीविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेमधील १२ अधिकाऱ्यांचे मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी येथून फेझ-१ चे प्रशिक्षण ५ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी राज्य शासनाकडे रुजू होणार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्राला नवे १२ आयएएस अधिकारी मिळाले असून जिल्हा प्रशिक्षणासाठी सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पदस्थापना करण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने १८ मार्च २०२४ रोजी निर्गमित केला आहे.
यात सिद्धार्थ शुक्ला (गडचिरोली), लघिमा तिवारी (यवतमाळ), अनुष्का शर्मा (नांदेड), जी. व्ही. एस. पवनदत्ता (नंदूरबार), कश्मिरा संखे (चंद्रपूर), बी. सरवनन (धुळे), अप्रिता ठुबे (बीड), अमर राऊत (अमरावती), वेवोतोलु केझो (जळगाव), डोंगरे रेवैयाह (वर्धा), अरुण (जालना), पूजा खेडकर (पुणे) या प्रशिक्षणार्थींची जिल्हानिहाय सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. ३१ जुलै २०२३ ते ३० जुलै २०२५ असा परीविक्षाधीन कालावधी असेल, असे आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव श्रीराम यादव यांनी आदेशाद्वारे जारी केले आहे.