अमरावती : ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ हा मुद्दा अलीकडे कर्मचाऱ्यांनी चांगलाच तापवला आहे. जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेत नसल्याने शिंदे-भाजप सरकार विरोधात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मत नोंदविले आहे.
नागपूर, अमरावती विधान परिषद निवडणुकीसह कसबा विधान परिषदेत भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. ही शाई पुसत नाही, तोच राज्याच्या पंचामृत अर्थसंकल्पात जुन्या पेन्शनबाबत कोणताही उल्लेख नाही. जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभे केले. आता तर १४ मार्चपासून राज्यातील १६ लाख कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.
कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसल्याने शासन, प्रशासन स्तरावरील कामकाजावर मोठा परिणाम होण्याचे संकेत आहे. आता राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना यासह विविध मान्यताप्राप्त संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशी भीष्मप्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे ‘जुन्या पेन्शनने वाढवले टेन्शन’, अशी चर्चा रंगत आहे.