वनगुन्हा नाही, संशयितांची चौकशी नाही; आंतरराज्य सागवान तस्करीत ‘सब गोलमाल है’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:17 AM2022-12-15T11:17:58+5:302022-12-15T11:26:47+5:30
महाराष्ट्र-मध्य प्रदेश आंतरराज्य सागवान तस्करी प्रकरण
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : महाराष्ट्र-मध्य प्रदेश आंतरराज्य सागवान तस्करीत पकडल्या गेलेल्या वाहनाच्या अनुषंगाने परतवाड्यातील एका पेट्रोल पंप संचालकाने मध्य प्रदेश वनअधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. या सागवान तस्करीत सहभाग असलेल्या परतवाड्यातील त्या संशयित सहा लोकांची साधी चौकशीही वनअधिकाऱ्यांनी केलेली नाही.
महाराष्ट्र वनअधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीत अवैध सागवान लाकडासह पकडलेले तस्करीतील वाहन, वाहनचालकासह २४ तासांच्या आतच मध्य प्रदेश वनअधिकाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या सुपूर्द केले आणि आता ‘सब गोलमाल’ची चर्चा सुरू झाली.
परतवाडा वनपरिक्षेत्रातील मौजा वडुरा येथील नाकाबंदीदरम्यान १९ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सीपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील व त्यांच्या पथकाने वाहन (एमएच २७ एक्स ७२४२) आणि दुचाकी (एमएच २७ सीएस ७४५२) मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. या घटनेच्या अनुषंगाने कुठलाही वनगुन्हा वन्यजीव विभागासह परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत दाखल केला गेला नाही.
दरम्यान, दिवस उजाडण्याआधीच मध्य प्रदेश वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह चालकासह वाहन आपल्या ताब्यात घेतले आणि सावलमेंढा वनपरिक्षेत्रांतर्गत २० नोव्हेंबरला वन गुन्हा दाखल केला. वाहनचालकास अटक दाखविली. बैतूल न्यायालयात प्रकरण दाखल केले.
परतवाड्यातील सहा लोक
या प्रकरणात परतवाड्यातील सहा संशयित लोकांचा सहभाग आहे; पण मध्य प्रदेश वनविभागाकडून यातील कुणाचीही साधी चौकशीही केली गेलेली नाही.
म्हणे फुटेज नाहीत
सागवान तस्करीत पकडलेले वाहन परतवाड्यातील असून, तस्करीच्या मोहिमेवर निघण्यापूर्वी या वाहनाने परतवाडा शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरल्याची माहिती मध्य प्रदेश वनअधिकाऱ्यांकडे आहे. या अनुषंगाने ते अधिकारी पाच दिवसांपूर्वी परतवाड्यातील संबंधित पेट्रोल पंपावर दाखल झाले. तेथील सीसीटीव्हीचे फुटेज बघण्याचा आणि ते मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला; पण ते फुटेज उपलब्ध नाहीत. ७२ तासांतच ते डिलीट होतात, असे पेट्रोल पंप संचालकाने सांगितल्यावरून संबंधित वनाधिकारी परतले.