बडनेरा : बडनेरा मतदारसंघात आतापर्यंत कुठल्याही उमेदवाराने हॅट्ट्रिक साधली नसल्याचा इतिहास आहे. विरोधी पक्षांनी कंबर कसल्याने आमदार रवि राणा यांनाही हॅट्ट्रिक साधणे अवघड ठरण्याची चिन्हे आहेत तर भाजप-सेनेत उमेदवारी मिळण्याकरिता रस्सीखेच सुरू आहे.
बडनेरा मतदारसंघाचे क्षेत्र शहरी व ग्रामीण असे आहे. यामध्ये अमरावतीचा बराच भाग, बडनेरा शहर, भातकुली तालुका व अंजनगाव बारीचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असताना अद्याप युती, आघाडीचे चित्र स्पष्ट नसल्याने मतदारांचे याकडे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदारांविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच इच्छुक व पक्ष पदाधिकारी हायकमांडच्या संपर्कात आहेत.
बडनेरा मतदारसंघातून काँग्रेसकडून राम मेघे यांनी, तर शिवसेनेतर्फे ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी दोनदा विजय प्राप्त केला. सलग दोनदा अपक्ष आमदार रवि राणा हेदेखील निवडून आलेत. गत निवडणुकीत भाजपची लाट असतानाही त्यांनी बाजी मारली. परंतु, यावेळी त्यांच्या सहचारिणी नवनीत राणा या खासदार असणे ही बाजू रवि राणा यांच्यासाठी जशी जमेची, तशीच ती नुकसानीचीही ठरली आहे. एकाच घरात दोन सत्ता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सत्तापक्षासह महाआघाडीद्वारे तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राणा दाम्पत्याने भाजपच्या हायकमांडशी संपर्क वाढविल्याने सेना-भाजपमध्ये त्यांच्याविषयी खलबते होत आहेत.युती झाल्यास बडनेरा मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवण्यासाठी शिवसेनेच्या इच्छुकांनी ‘मातोश्री’शी संपर्क वाढविल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याची स्थिती आहे. बडनेरा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा, असा आग्रह पक्षाच्या इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गळ घातल्याचे राजकीय गोटातून समोर आले आहे. भाजपकडून तुषार भारतीय, शिवराय कुळकर्णी, शिवसेनेकडून प्रीती बंड, सुनील खराटे, काँग्रेसकडून प्रदीप हिवसे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिनेश आडतिया ही नावे चर्चेत आहेत. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे सूत्र जुळत नसल्याने हे दोन्ही पक्ष स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. बसपाची मतदारसंघात व्होटबँक असून, महापालिकेत सहा नगरसेवक प्रतिनिधित्व करीत आहेत. हा पक्षदेखील तगड्या उमेदवाराचा शोध घेत आहे.
बडनेरा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. परंतु, यावेळी भाजप उमेदवारीसाठी दावेदारी करीत असल्याने हा मतदारसंघ भाजपला की सेनेला, हा संभ्रम मतदारांमध्ये आहे. सेनेचे माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांच्या नावाला मतदारसंघात पसंती असल्याचे चित्र आहे.