संदीप राऊत
तिवसा (अमरावती) :
‘एक दिन जाना गांधीजी ने मेरा भजन अप्रतिमसे
वह कह गये, फिरसे कहो, रहते हुए भी मौनसे
हसते कहा फिर दुसरे दिन, मौन मेरा छूट गया
मै मस्त होने पर भजन मे, ख्याल से भी हट गया’
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयातील ही आठवण त्यांच्या भजनातील माहात्म्य अधोरेखित करते. १४ जुलै १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता व राष्ट्रसंत या दोन महान विभूतींची प्रथमच भेट झाली. राष्ट्रसंतांना पाहताच महात्मा गांधी प्रभावित झाले होते. हे कुणी साधू-संत नसून देश कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे व समाजप्रबोधन करणारे महान युगप्रवर्तक असल्याची प्रचीती महात्मा गांधी यांना पहिल्या भेटीतच आली होती.
२४ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३५ दरम्यान तुकडोजी महाराजांनी सालबर्डीच्या घनदाट जंगलात महारुद्र यज्ञाचे आयोजन केले होते. यामध्ये दहा लाखांवर महिला-पुरुषांना अन्नदान करण्यात आले; परंतु काही समाजकंटकांना महाराजांची समाजसेवा पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी महाराजांच्या पावन कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तुकड्याबुवा धनदांडग्यांकडून जमा केलेल्या धान्याची जंगलात वायफळ उधळण करीत बुवाबाजी करीत असल्याचा आरोप करण्यात आला. सत्यता जाणून घेण्यासाठी गांधीजींनी नागपूर येथील काँग्रेस नेते बाबूराव हरकरे व शंकरराव टिकेकर यांना आदेश देऊन महाराजांना सेवाग्राम आश्रमात येण्यासाठी संदेश पाठवला. प्रथम भेटीतच काहीही संवाद न साधता महाराजांबद्दल पसरविण्यात आलेला गैरसमज गांधीजींच्या मनातून चुटकीसरशी दूर झाला. एक महिन्याच्या सान्निध्यानंतर महाराजांनी सेवाग्राम आश्रमाचा निरोप घेतला त्यावेळी अतिशय जड अंतःकरणाने गांधीजी व आश्रमातील सेवेकऱ्यांनी महाराजांना अनुमती दिली. त्यावेळी गांधीजींनी महाराजांना एक चरखा भेट दिला.
म्हणूनच महाराज म्हणतात,
‘मै गांधीजी का नही शिष्य रहा,
ना गांधी कही मेरे भक्त रहे
पर प्रेम था हम दोनो मे बडा,
वह मिटा न सका कोई लाख कहे’