पुसला : येथील ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सरपंच-उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी गटाचा एक उमेदवार फुटल्यामुळे महाविकास आघाडीचे समीकरण बिघडले. त्यामुळे पुसला ग्रामपंचायत काँग्ररेसच्या एकहाती ताब्यात गेली आहे.
वरूड तालुक्यातील पुसला या १७ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस गटाचे ८, राष्ट्रवादी ६, व भाजप गटाचे ३ उमेदवार निवडून आले होते. कोणत्याच गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सरपंच कोणत्या गटाचा बसेल, हे कोडेच होते. त्यातच सर्वसाधारण आरक्षण घोषित झाल्याने सरपंचपदाकरिता चढाओढ सुरू झाली होती. काँग्रेस गटाला सत्ता प्रस्थापित करण्याकरीता एका सदस्याची गरज, तर राष्ट्रवादी गटाला सत्ता प्रस्थापित करण्याकरीता तीन सदस्यांची आवश्यकता होती. राष्ट्रवादी गटाने भाजपला सोबत घेऊन बैठक घेतली. त्यानुसार सरपंच, उपसरपंचपद राष्ट्रवादी व भाजप समर्थित पॅनेलकडे राहील, यावर एकमत झाले. परंतु, सरपंच निवडीवेळी अचानक राष्ट्रवादी गटाचा एक उमेदवार फुटल्याने ग्रामपंचायतची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली. सरपंचपदी धनराज बमनोटे व उपसरपंचपदी निकेलेश खंडेलवाल यांची वर्णी लागली.
---------------