कॅप्शन - पत्रकार परिषदेला संबोधित करताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे आदी.
----------------------------------------------------------------------------------------------------------
रामदास आठवले यांचे प्रतिपादन, काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून सेनेने भाजपशी युती करावी
अमरावती : १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत केले.
केंद्र सरकारने मराठा आरक्षणसंदर्भात संसदेत विधेयक मंजूर केले आहे. एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते, हे लक्षात घेऊन घटनेत नमूद असलेल्या ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारने चालविल्या आहेत. मात्र, तामिळनाडू सरकारने ६९ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले आहे. हे उदाहरण समोर ठेवून एखाद्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असेल, तर आरक्षणाची टक्केवारी वाढली, तर हा विषय गौण ठरवावा, असे ना. आठवले म्हणाले. घटनेच्या ३४२ अ (३) मध्ये १२७ वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाची स्वत: ची यादी तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी न्यायिक आहे. ज्यांची उत्पन्न क्षमता आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक आहे, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरल्यास महाविकास आघाडी सरकारची सळो की पळो अशी स्थिती होईल, असा टोलाही ना. आठवले यांनी लगावला.
पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, सिनेट सदस्य मनीष गवई, ओमप्रकाश बनसोड आदी उपस्थित होते.
---------------------------
सेनेने भाजपशी जुळवून घ्यावे
महाविकास आघाडी सरकार किती दिवस राहील, हे सांगता येत नाही. मात्र, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी युती करावी. याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोललो आहे. सेनेने तसे पाऊल उचलल्यास भाजप-सेना पुन्हा युती होऊन राज्यात जनतेच्या हिताचे सरकार स्थापन होईल, अन्यथा येत्या काळात शिवसेना संपेल, असा इशारा ना. रामदास आठवले यांनी दिला. जनतेच्या हितासाठी महायुतीचे सरकार आले पाहिजे, असे ना. आठवले म्हणाले.
-----------------
प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाइंचे ऐक्य नाही
एकट्या रिपाइंच्या भरवशावर आमदार, खासदार निवडून येणे शक्य नाही. त्याकरिता मोठ्या पक्षाशी युती, आघाडी करावी लागेल. रिपाइंच्या ऐक्यासाठी मी तयार आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग करतो. मात्र, प्रकाश आंबेडकर हे सोबत आले तरचं रिपाइंचे ऐक्य नाही, असे ना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली, पण अपशय आले, हा इतिहास बघता रिपाइंने वाटचाल करावी, असे ना. आठवले म्हणाले.