अमरावती : महावितरणद्वारा चार प्रकारचे मोबाईल अॅप्स विकसित करुन कामकाज पेपरलेस करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कागदांचा वापर कमी करुन संगणक व मोबाईलवर वीजबिल मिळणे तसेच बिल भरणे ग्राहकांना शक्य होईल.वीज ग्राहक, कर्मचाऱ्यांसाठी महावितरणद्वारा जुलै महिन्यात उपलब्ध ‘मोबाईल अॅप्स’ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत ३ लाख ७० हजार वीज ग्राहकांनी हे अॅप्स डाऊनलोड केले आहेत तर ५६ हजार ग्राहकांनी महावितरणच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केले आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’मध्ये पहिल्या १५ फ्री बिझनेसमध्ये महावितरणच्या या मोबाईल अॅप्सचा समावेश आहे. विजेसंबंधी सर्व सेवा ग्राहकांना सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असे हे चार नवीन मोबाईल अॅप्स विकसित केले आहेत. संगणक व स्मार्ट फोनच्या या युगात ‘पेपरलेस’ व्यवहाराच्या दृष्टीने ग्राहकांसाठी हे पाऊल नक्कीच फायदेशीर ठरणारे आहे. घरबसल्या विविध माहिती या अॅप्सद्वारे मिळू शकते. या अॅप्समध्ये विविध पर्याय आहे. वीजबिलांचा भरणा, वीजसेवांबाबत तक्रारी, मीटर रिडिंग पाठविणे, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याच्या सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या अनेक तक्रारींचा निपटारा घरी बसूनच करता येईल. यामुळे वेळ आणि श्रम वाचणार आहेत. (प्रतिनिधी)सोशल मीडियावर अॅप्सची माहिती महावितरणने ग्राहकांसाठी विकसित केलेले अॅप राज्यभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचावे व त्यांना या अॅप्सचा फायदा व्हावा, यासाठी त्याचा प्रसार-प्रचार होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घऊन महावितरणने सोशल मिडियावर अॅप्सची माहिती सांगणारे ‘जिंगल’ टाकले आहे. व्हॉटस् अॅप, फेसबुक आदी सामाजिक संकेतस्थळावरुन ग्राहकांना अॅप्सची माहिती देण्यात येत आहे.
महावितरण होणार पेपरलेस, चार प्रकारचे मोबाईल अॅप्स विकसित
By admin | Published: August 18, 2016 12:10 AM