लोकमत विशेषजितेंद्र दखने अमरावतीमहावितरणच्या परिमंडळ (झोन) कार्यालयांच्या विभाजनाचे स्पष्ट संकेत राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे अमरावतीत प्रस्तावीत नव्या झोनच्या मुख्य अभियंत्यांचे कार्यालय सुरू होणार असून याअंतर्गत दोन कार्यकारी परिमंडळ अस्तित्वात येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात दोन जिल्हे मिळून एक परिमंडळ कार्यालयाची रचना आहे. मात्र विदर्भात हीच परिमंडळ पाच जिल्हे मिळून एक अशी रचना आहे. त्यामुळे मुख्य अभियंता आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी पाच जिल्ह्यांचा कारभार पाहावा लागत होता. परिणामी कामांचा वाढता ताण कमी करण्यासाठी अमरावती आणि नागपूर परिमंडळाचे विभाजन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अमरावती विभागाचे परिमंडळ अकोला येथे आहे. या मुख्य अभियंत्यांच्या झोन कार्यालयातून अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा या पाच जिल्ह्यांचा वीज वितरण कंपनीच्या महानिमिर्ती, महा पारेषण, महा वितरण या तीनही कंपन्यांचे कामकाज पहावे लागत होते. यामुळे या जिल्ह्यातील वीज ग्राहकांना मुख्य झोन कार्यालयाच्या कामांसाठी अकोला येथे जावे लागत होते. यामध्ये ग्राहकांचा व अधिकाऱ्यांचाही बराच वेळ जात होता. कामकाजातही अधिक वेळ घालावा लागत असल्याने वीज वितरण कंपनीशी संबंधित कामे त्वरित करता यावी यासाठी अकोला परिमंडळाचे विभाजन करून नव्याने अमरावती परिमंङळ (झोन) सुरू होत आहे. यानुसार नव्या अमरावती झोन मध्ये अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे. अकोला झोनमध्ये अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश राहील. नवीन अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय व त्याअंतर्गत यवतमाळ व अमरावती परिमंडळ असे दोन कार्यालये अस्तित्वात येणार आहे.
अमरावतीत होणार महावितरणचे नवे झोन!
By admin | Published: August 19, 2015 12:47 AM