फोटो - वरूड १८ पी
जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर
संजय खासबागे
वरूड : नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या वरूड तालुक्याच्या वनवैभवात भर टाकणाऱ्या महेंद्री जंगलाला अभयारण्य घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ५ ऑगस्टच्या शासननिर्णयानुसार यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. या जंगलाला सातपुड्याच्या किनार लाभली आहे. वर्धा डायव्हर्शन, सुपर एक्सप्रेस कॅनाल, शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नदी याच पर्वतातून येतात. वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरीण, रानडुक्कर यांसारखे प्राणी या जंगलात आहे. अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आहेत. वनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. १०८ वर्षांचे ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृहसुद्धा आहेत. वाघांची संख्या वाढली असून, मेळघाट ते ताडोबा आणि पेंचकरिता वाघांच्या आणि हिंस्त्र प्राण्यांच्या आवगमनासाठी महेंद्री जंगल परिसर हा मुख्य कॉरिडॉर आहे. अभयारण्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संध्या मिळेल, तर पर्यटकांची गर्दी वाढून जंगल सफारीचे माध्यमातून शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल. विदेशी पर्यटक, अभ्यासगट तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा विविध संशोधनाची सुविधा मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने २६ सप्टेंबर २०२० च्या बैठकीनंतर राजकीय आणि आणि वनक्षेत्रातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्याने प्रक्रिया काही काळ थंडबस्त्यात पडले होते. परंतु, ५ ऑगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महेंद्रीला अभयारण्याच्या कार्यवाहीला गती देऊन समिती नेण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ११ पैकी मोगरकसा वगळून १० संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावास मंडळाने मान्यता
प्रदान केली.
पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासणार
सुरुवातीला महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करून नंतर स्थानिक हितसंबंधित यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासून नजीकच्या काळात अभयारण्य घोषित करण्याची शक्यता पडताळून पाहण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
----------------------
महेंद्री अभयारण्य घोषित होणे गरजेचे आहे. यामुळे आदिवासींचा विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. अभयारण्य होण्यामागे प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.
- विजय श्रीराव, पुसला
----------------महेंद्री जंगल ही तालुक्याची शान आहे. अभयारण्य घोषित होणे म्हणजे विकासाची नांदी असून पर्यटनामुळे रोजगार व विकास होईल. इतर पर्यटनस्थळाचासुद्धा विकास होईल.
- सचिन आंजीकर, वरूड