वन्यजीव मंडळाचा निर्णय : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मान्यता
वरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या महेंद्री जंगलाला राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी वन्यजीव मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा केली होती.
वरूड तालुक्यात १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक वनक्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी या नद्या याच पर्वतातून सखल प्रदेशात येऊन तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा-१, नागठाण-२, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प, पंढरी प्रकल्प असून, वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरिण, रानडुकरांसारखे प्राणी या जंगलात आहेत. अनेक पक्षी, फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. वनौषधी परिसर असून, या जंगलामध्ये अनेक प्रकारची वृक्षे आहेत. १०८ वर्षांचे ऐतिहासिक विश्रामगृहसुद्धा आहे. यामुळे महेंद्री जंगलाला राखीव संवर्धन क्षेत्र तसेच वनपर्यटन क्षेत्र म्हणून मंजूर करावे, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती.
असे होईल संवर्धन
महेंद्री जंगल संवर्धन राखीव क्षेत्र बनल्याने येथील दुर्मीळ वनौषधी, वन्यजिवांचे संवर्धन प्राधान्याने केले जाईल. या परिसरातील नागठाणा तलाव, वाई तलाव, जामगाव तलाव, पंढरी तलाव, एकलविहीर तलाव, शेकदरी तलावांचे योग्य जतन करण्यात येईल. जंगलातील जैवविविधतेला बळ देण्यात येणार आहे.
------------------