१३ महिला संचालक अविरोध : विदर्भाच्या सहकारक्षेत्रातील पहिली घटनातिवसा : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये संपूर्ण महिला सदस्य निवडून दिल्याची उदाहरणे अनेक आदर्श गावांमध्ये घडलेली आहेत. मात्र, सहकारक्षेत्रात अजूनही पुरूषप्रधान संस्कृतीचा बोलबाला आहे. या सर्व प्रतिगामी विचारांना तिवसा सेवा सहकारी सोसायटीमध्ये छेद देण्यात आला आहे. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत सर्व समाजाच्या प्रतिनिधिक स्वरूपात सर्वच म्हणजे १३ ही संचालकपदासाठी महिला उमेदवार अविरोध निवडून येणार आहेत.गावपातळीवर सेवा सहकारी सोसायटी ही महत्त्वपूर्ण संस्था आहे. याच सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. जिल्हा बँकेचे कर्ज देखील याच सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप होते. सहकारातील जिल्हा सहकारी बँक, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिनिंग-प्रेसिंग संघ आदींच्या निवडणुकीत सोसायटीच्या प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असतो. त्यामुळे या सोसायटींना सहकारक्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे सहकारक्षेत्रामध्ये वर्चस्व कायम राखण्याकरिता अनेक राजकीय मंडळींचा डोळा या निवडणुकीवर असतो. परंतु तिवसा येथील सोसायटीच्या सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत यासर्व प्रकाराला फाटा देऊन सर्व महिला संचालकांना अविरोध निवडून आणण्यात आले आहे. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या तिवसा येथील सोसायटीवर संजय वैकुंठराव देशमुख यांचा दोन दशकापासून एकछत्री अंमल राहिला आहे. त्यांनीच पुढाकार घेत शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दिनेश वानखडे यांच्याशी संवाद साधला व दिनेश नाना यांनीही सहकार्याची भूमिका घेतल्याने या सोसायटीवर महिला राज संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. यामध्ये आ. यशोमती ठाकूर यांचे समर्थक संजय वानखडे यांच्या गटाचे ८ व दिनेश वानखडे यांच्या गटाच्या ५ महिला संचालक अविरोध विजयी झाल्या आहेत. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या सर्व महिला संचालकांना अविरोध घोषित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)तिवसा मतदारसंघात महिलाराजतिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर आहेत. तसेच नगरपंचायतीच्या अध्यक्ष राजकन्या खाकसे आहेत. तिवसा पंचायत समितीच्या सभापती अर्चना विरूळकर व तिवसा जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य सुनीता देशमुख आहेत. आता तिवसा सोसायटीचे अध्यक्षपददेखील महिलेकडेच येणार आहे. त्यामुळे तिवसा पंचायत समिती सदस्य श्याम देशमुख वगळता सर्वच ठिकाणी खऱ्या अर्थाने ‘महिलाराज’ आहे. या महिला संचालक अविरोध तिवसा सोसायटीमध्ये संजय वानखडे गटाच्या शैला संजय देशमुख, सुशीलाबाई रामकृष्ण खाकसे, प्रमिला शंकरराव खुरपडे, रजनी श्रीधर देशमुख, ज्योती मुकुंद वानखडे, रेखा रवींद्र वैद्य, आरती पद्माकर गौरखेडे, वंदना अशोक इंगळे तर दिनेश वानखडे गटाच्या अरूणा पांडुरंग वानखडे, बेबीताई साहेबराव गौरखेडे, अनिता अनिल थूल, स्रेहा अंकुश देशमुख व नंदा रविशंकर डहाके या महिला संचालक अविरोध निवडून आल्या आहेत.
तिवसा सेवा सहकारी सोसायटीमध्ये ‘महिला राज’
By admin | Published: September 28, 2016 12:14 AM