तिवसा : वरखेड येथील श्रीमंत चंद्रप्रभा ऊर्फ माई बोके यांचे रविवारी निधन झाल्याच्या वार्तेने अवघा जिल्हा हळहळला. समाज माध्यमातून श्रद्धांजलीचा पाऊस पडला. गावात अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली. सोमवारी सकाळी पुन्हा चाहत्यांची गर्दी झाली अन् दुपारी माईंचे पुत्र विक्रम यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानुसार ‘चमत्कार झाला.. माईसाहेब जिवंत आहेत.’ त्यामुळे क्षणात दु:खाचे वातावरण आनंदात परिवर्तित झाले.
माईसाहेब दुर्धर आजाराने त्रस्त असल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रविवारी दुपारी तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर माई ‘ब्रेनडेड’ असल्याचे त्यांचे पुत्र व आप्तांना सांगितले. रविवारी अमावस्या असल्याने सोमवारी व्हेंटिलेटर काढण्याची सूचना त्यांना केल्याचे आप्तांनी सांगितले.
माई आता हयात नसल्याचे डॉक्टरांनी मौखिक सांगितल्याने माईसाहेबांच्या निधनाची वार्ता पंचक्रोशीत पसरली. गावात अंत्यसंस्काराची तयारीदेखील सुरू झाली. सोमवारी सकाळी व्हेंटिलेटर काढण्यात आले. मात्र, ब्रेनडेड असल्या तरी हृदयाच्या ठोके मंदगतीने सुरू असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे निधनाची वार्ता ही खोटी ठरली व दु:खाचे वातावरण क्षणात आनंदात परिवर्तित झाले व त्यांचे पुत्र विक्रम यांनी माई हयात असल्याबाबत समजमाध्यमांवर तत्काळ व्हिडीओ टाकला व क्षणात तो व्हायरलदेखील झाला.