१५ गावांचा संपर्क तुटला :
धारणी : शहरापासून ५० किलोमीटर अंतरावरील राणीगाव घाटातील दरड कोसळून राणीगाव ते सुसर्दा धारणी, असा हा लांबपल्ल्याचा मार्ग बंद झाल्याने १५ गावातील नागरिकांचा संपर्क मुख्यालयापासून तुटलेला आहे.
दोन दिवसापासून मेळघाटात संततधार पाऊस सुरू असल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगर-दऱ्यातून निर्माण झालेले छोटे-मोठे नाले तुडुंब वाहत आहेत. अशातच डोंगराच्या कपारी खचल्याने धारणीपासून लांबपल्ल्याच्या उंच ठिकाणावरील राणीगाव-सुसर्दा धारणी या मुख्य मार्गावर दरड व मोठमोठे दगड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णता बंद झाला आहे. त्यामुळे राणीगाव, सिंधबंद, गोलाई, कंजोली, धूळघाट रेल्वे, चेंडौ, पळसकुंडीसह १५ गावांचा संपर्क मुख्यालयापासून तुटला आहे.
बॉक्स
दिया - बैरागड मार्ग दुपारी ३ नंतर सुरळीत
धारणी मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावरील दिया गावाजवळ बैरागड मार्गाला जोडणारा सिपना नदीवरील मोठा पूल आहे. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे गुरुवारी पहाटे सिपना नदीला महापूर आला. त्यामुळे दियाजवळील पुलावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे परिसरातील ३५ गावांचा संपर्क तुटला. परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. धारणीकडे निघालेल्या नागरिकांना पुरामुळे नदीच्या काठावरच थांबावे लागले. त्यांनतर दुपारी ३ वाजानंतर पुराचे पाणी कमी झाल्याने डिया बैरागड मार्ग सुरू झाला तर हरीसाल वरून चिखली जाणारा मार्ग सुद्धा बंद होता तो पण पुराचे पाणी ओसरल्यावर रस्ता मोकळा झाला.
मेळघाटातील बीएसएनल सेवा बंद
परतवाडा वरून फायबर केबलने धारणीला बीएसएनलची थ्री जी सेवा घटांग सेमाडोह हरिसालमार्गे धारणीला पोहचली आहे. नदीला पूर आल्याने या मार्गावरील नदीच्या पुलावरून येणाऱ्या फायबर केबल पुराच्या पाण्यामुळे तुटले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा खंडित झाली आहे. तरठ दिवसाआधी धारणीतील बीएसएनलच्या टाॅवरवर वीज कोसळल्याने तेथील कंट्रोल रूममधील वायर जळाले होते. त्यामुळे तालुक्यातील इंटरनेट सेवा अवलंबून असून शहरातील शासकीय कार्यालयातील ऑनलाइनची कामे ठप्प पडली. तालुक्यातील बँकेची सुविधा सहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण हेलपाटे सहन करावे लागत आहे.