महसूल, वनविभागाचा निर्णय, ३८ अस्थायी पदांना मुदतवाढ
अमरावती : राज्याच्या संवेदनशील वनक्षेत्रात वनसंरक्षणाकरिता राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या पुन्हा कायम ठेवण्यात आल्या आहेत. या तीन तुकड्यांमधील एकूण ३८ अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. महसूल व वनविभागाच्या निर्णयानुसार १ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत या तिन्ही तुकड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
वनांचे संरक्षण, वन्यजीव तस्करी रोखणे, वनांचे अतिक्रमण काढणे, सीमेवर गस्त आदी वनक्षेत्रांचे संरक्षणकामी वनाधिकारी यांच्याकडून आलेल्या मागणीनुसार ही एसआरपीएफची तुकडी पाठविली जाते. गत काही वर्षांपासून संवेदनशील वनक्षेत्रात वनसंरक्षणाकरिता राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या कायम स्वरूपी वनविभागाकडे ठेवणे या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन २०२१-२२ या वर्षात पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या एसआरपीएफच्या तिन्ही तुकड्या संवेदनशील वनक्षेत्र संरक्षणासाठी चांद्यापासून तर बांद्यापर्यंत कुठेही पाठविल्या जातील, असे शासनादेशात महसूल व वन विभागाचे उप सचिव गजेंद्र नरवणे यांनी स्पष्ट केले. एसआरपीएफ तुकड्यात सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक १, सशस्त्र पोलीस हवालदार ६, सशस्त्र पोलीस शिपाई २४, पोलीस शिपाई चालक ३, सहायक स्वयंपाकी २, भोजन सेवक २ अशा अस्थायी ३८ पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.