तिवसा नगरपंचायत : वर्षभरापासूनचा सुटला तिढातिवसा : तांत्रिक कारणांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नगरपंचायतीच्या विषय समित्यांचा तिढा अखेर निकाली निघाला. सभागृहात सत्तापक्षात असणाऱ्या कॉँग्रेसचे सहापैकी चार समितींचे सभापती अविरोध निवडून आले तर शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसला प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले आहे. यापूर्वी झालेल्या विषय समिती निवडणुकीच्यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी पक्षपात केल्याचा आरोप करीत नगरपंचायतीचे उपाध्यक्ष वैभव वानखडे व कॉँग्रेसच्या गटनेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. मात्र, या निर्णयाविरोधात विरोधकांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले. तेथेही हाच निर्णय कायम राहिला. या निर्णयाविरोधात विरोधी सदस्यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने नव्याने विषय समिती निवड करण्याचे आदेश दिलेत. त्याअनुषंगाने १९ जानेवारीला विषय समितीची निवड करण्यात आली. यामध्ये पीठासीन अधिकारी राम लथाड व मुख्याधिकारी सचिन गाढे यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. बांधकाम समितीत वैभव वानखडे, दिवाकर भुरभुरे, हिमानी भोसले, प्रदीप गौरखेडे व सविता सुरजुसे, शिक्षण समितीमध्ये सारिका दापूरकर, संध्या मुंदाने, रामदास मेहत्रे, मोहिनी शर्मा व किशोर सातपुते, आरोग्य समितीमध्ये नरेंद्र विघ्ने, मधुकर भगत, अनिल थुल, जयश्री गुल्हाने व महिला बालकल्याण समितीमध्ये संध्या पखाले, सारिका दापूरकर, संध्या मुंदाने, जयश्री गुल्हाने यांची निवड करण्यात आली होती. गुरूवारी विषय समिती सभापतीपदासाठी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राम लथाड व मुख्याधिकारी सचिन गाढे यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यामध्ये चार समिती सभापतीपदी काँग्रेस व प्रत्येकी एका समिती सभापतीपदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेत. एक नगरसेवक जर सभापतीपदाचा सूचक किंवा अनुमोदक झाल्यास त्याला दुसऱ्या समितीसाठी सदस्य किंवा सूचक व अनुमोदक होता येत नसल्याने कॉँग्रेसचे बहुमत असताना शिवसेना व राकाँला प्रत्येकी एक सभापती पद मिळाले. असे आहेत सभापती स्थायी समिती राजकन्या खाकसे (काँग्रेस), बांधकाम समिती वैभव वानखडे (कॉँग्रेस), आरोग्य सभापती मयुरी अंबुलकर (कॉँग्रेस), महिला बालकल्याण समिती संध्या पखाले (कॉँग्रेस), पाणीपुरवठा समिती अनिल थुल (शिवसेना), शिक्षण सभापती मोहिनी शर्मा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
विषय समित्यांवर काँग्रेसचे बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 12:36 AM