अमरावती : राज्याने दोन हजार मेगावॅटचा ‘सौरऊर्जा प्रकल्प’ हाती घेतला आहे. हा प्रकल्प उभारण्याकरिता प्रत्येक गावाने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्याच्या पातळीवर थेट सरपंचांशी संवाद साधून सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयातून गुरुवारी ऊर्जामंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागातील पाचही जिल्हाधिका-यांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त पीयूष सिंह आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री सौर वाहिनीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी ज्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्या प्रमाणात हस्तांतरित करण्यात याव्यात. सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतक-यांना कृषिपंपांना वीजपुरवठा करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे गावातील प्रकल्प असलेल्या पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्तीसाठीही अत्यल्प किंवा मोफत वीज देता येऊ शकेल. एका ग्रामपंचायतीमध्ये किमान दोन मेगावॅटचा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरपंचांची कार्यशाळा, बैठका घेऊन त्यांनी सौरऊर्जा प्रकल्पांना जागा उपलब्ध करून दिल्यास गावाकरिता सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होणार होईल. जागा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिका-यांना प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यवतमाळ जिल्ह्यात १४६ एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे. उर्वरित जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात ४६ एकर जागा दिलेली असून, जागा उपलब्ध होण्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्न करण्यात येतील तसेच गावामध्ये जागा शोधण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी मंत्र्यांना सांगितले.
सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्या, ऊर्जामंत्र्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 8:05 PM