अमरावती ; कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रक्रिया सध्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रात सुरू आहे.मात्र लसीकरणासाठी आता ग्रामीण भागात नागरिकांची जनजागृती झाल्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे.वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे कोरोना लसीकरणाची नोंदणी व लसीचा डोज देण्याची व्यवस्था वेगवेगळया ठिकाणी करावी अशी मागणी बुधवार २८ एप्रिल रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचेकडे लेखीपत्राव्दारे झेडपी सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी केली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून १४ तालुक्याती सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर लसीकरण शिबीर सुरू आहेत. लसीकणाला सुरूवातीला फारसा प्रतिसाद नव्हता परंतु लसीकरणाबाबत जनजागृती केल्यामुळे आता लसीकरणासाठी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.वाढत्या गर्दीवर नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचारी,अधिकारी स्तरावर बराचसा वेगवेगळया मार्गाने प्रयत्न केले जात आहेत.तरीही लोकांची गर्दी नियंत्रणात आणणे शक्य न झाल्यास वेळप्रसंगी काही काळासाठी लसीकरण थांबवावे लागते.पोलिसांची मदतही घ्यावी लागते.अशातच स्थानिकांची किंवा आपत्ती व्यवस्थापन समितीची मदतही पाहीजे तसी मिळत नाही.अशातच आता होत असलेली गर्दी हा ट्रेलर आहे.परंतु १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर ही गर्दी आवरणे हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता असून वादाचेही प्रसंग ओढविण्याची शक्यता आहे.ही बाब लक्षात घेता लसीकरणासाठीची नोंदणी ग्रामपंचायत व सोईच्या ठिकाणी स्वतंत्र करावी तसेच लसीकरण वेगळया ठिकाणी करणे आवश्यक आहे.नोंदणी व लसीकरण या दोन्ही व्यवस्था वेगवेगळया केल्यास लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करण्यसाठी मदत होईल व संसर्गाचा धोकाही टाळता येवू शकतो.त्यामुळे याबाबत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी सीईओंकडे सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी केली आहे.