लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या मेळघाटातील चार गावांपैकी घोटा गावातील कुपोषित बालक आठवडाभर औषधोपचार घेतल्यानंतर शनिवारी रात्री दगावले. या कुपोषित बालकाचे प्राण वाचविण्यात शासकीय यंत्रणा ‘फेल’ ठरली आहे. सुमित बालकराम जांबेकर (५) असे मृत बालकाचे नाव आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सन-२०१५ मध्ये मेळघाटातील घोटा, भुलोरी, राणामालूर व बेसावर्डा ही चार गावे कुपोषणमुक्तीसाठी दत्तक घेतली होती. या चारही गावांवर मुख्यमंत्र्यांसह आयएएस अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी देखील सातत्याने मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावांवर सूक्ष्म लक्ष ठेवून होते. मात्र, मागील आठडवड्यात सुमित जांबेकर याला कुपोषणाने ग्रासल्याने त्याच्यावर प्रारंभी हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेत. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात १४ जून रोजी पाठविले. परंतु या बालकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे शासकीय मेडिकल रूग्णालयात १६ जून रोजी उपचारासाठी पाठविले. तेथे त्याच्यावर १६ ते २१ जूनदरम्यान मेडिकलमध्ये नियोजनबद्धपणे उपचार सुरू झालेत. पाच दिवसांनंतर बालकाची प्रकृती सुधारताच त्याच्या आई-वडिलांनी २२ जून रोजी नागपूर येथील शासकीय मेडिकल रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना काहीही न कळविता बाळाला घेऊन परस्पर घोटा गाव गाठले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी या बालकावर पारंपरिक पद्धतीने भूमकाद्वारे उपचार सुरू केलेत. मात्र, या बालकाची प्रकृती फारच ढासळली असल्याचे हे वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले. पुन्हा आरोग्य यंत्रणा जागी झाली आणि कुपोषित बालकाला अमरावतीच्या ‘होप’ या खासगी रूग्णालयात २४ जून रोजी उपचारासाठी दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांचा होता सूक्ष्म ‘वॉच’अमरावती : आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी १ जुलै रोजी उशिरा रात्री १ वाजता प्राणज्योत मालवली. आई-वडिलांचे अज्ञान, आरोग्य यंत्रणांचे दुर्लक्ष आदींमुळे सुमितला प्राण गमवावे लागले, हे विशेष.सुमित जांबेकर (साडेपाच वर्षे) याकुपोषित बालकाचे प्राण वाचावेत, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे स्वत: सूक्ष्म लक्ष ठेवून होते. नागपूर मेडिकलमधून सुमितला त्याचा आई-वडिलांनी उपचाराविनाच परत आणले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उपचार करण्यासाठी त्याला पुन्हा अमरावतीत आणले. सुमितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालातील अतिदक्षता विभागात ठेवले. सुमितचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, सीएस अरुण राऊत यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेली अन् सुमित दगावला.
मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील कुपोषित बालक दगावले
By admin | Published: July 03, 2017 12:29 AM