वरूड (अमरावती) : अमरावतीहून इंदूरला जात असलेल्या कुटुंबातील मामा आणि भाची अशी दोघांचा मध्य प्रदेशातील इंदूर-बैतूल मार्गावर रविवारी रात्री अपघातातमृत्यू झाला. बैतूलच्या पुढे चिंचोली ठाण्याच्या हद्दीत ग्राम बेला जोडनजीक हा अपघात घडला.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथील साहू कुटुंबातील सातजण इंदूर येथे होत असलेल्या लग्न सोहळ्यासाठी कारने निघाले होते. रात्री उशिरा प्रवासाला निघाल्याने चालकाला डुलकी लागली आणि ती कार कंटेनरला भिडली. या अपघातात कार चालवीत असलेले विकास साहू (वय २८, रा. इंदूर), त्यांची पत्नी सोमती साहू (२५), मुलगा विशांत, बहीण पूजा (३०, रा. अमरावती), जावई मनीष साहू, निधी (१०), प्रीतिका (४) व आठ महिन्यांची मायरा हे जखमी झाले.
गंभीर जखमी झालेले चालक विकास व त्यांची भाची निधी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सर्व जखमींना चिचोली आराेग्य केंद्रावर उपचारासाठी आणले गेले. गंभीर जखमी मायरा व तिची आई पूजा साहू यांना बैतूल जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले. चिंचोली ठाण्याचे प्रभारी अजय सोनी, उपनिरीक्षक खुशयाल बघेल, मुलायम सिंह, गौतम सिंह यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.