अमरावती : बस स्टॅन्डनजीक उभ्या असलेल्या २७ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ता तिला एका बारच्या आत घेऊन गेला. तेथून त्याने एकाला फोन लावला. 'मुलीला आणतोय, दारूची व्यवस्था कर', असे समोरच्याला बजावले. आरोपीचा प्लॅन लक्षात आल्याने, त्या तरुणीने तेथून कशीबशी सुटका करवून घेतली आणि मोठा अनर्थ टळला.
तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव चौफुलीवरील एका हॉटेलजवळ २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ८.३०च्या सुमारास ही थरारक घटना घडली. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी २९ रोजी संशयित आरोपी म्हणून रोशन विनायक रोहनकर (३०, रविनगर, अमरावती) विरुद्ध भादंविचे कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला.
घटना अशी, २७ वर्षीय तरुणी तिच्या कार्यालयातील सहकार्याच्या लग्नासाठी चांदूर रेल्वे येथे जात होती. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास ती देवगाव बस स्टॅन्डवरील एका हॉटेलजवळ उभी होती. त्यावेळी पाठलाग करत रोशन हा यवतमाळहून देवगाव येथे आला. तरुणीला त्याच्या एमएच ४९ एवाय ५३५६ या वाहनावर बसवून तो तिला जवळच्या एक बारमध्ये घेऊन गेला. तेथून त्याने एकाला फोन लावला. 'आपण एका मुलीला घेऊन अमरावतीला येत असून, तू दारूची व्यवस्था कर, आपण तिला दारू पाजून तिच्यावर अतिप्रसंग करू', असे म्हटले. ते ऐकू आल्याने तरुणी हादरली. आरोपीचा प्लॅन लक्षात आल्याने, ती शिताफीने बारच्या मागील दाराने तेथून पळून गेली व तत्काळ पोलिसांनाही माहिती दिली. पोलीस तेथे गेले असता, तो मद्याच्या नशेत आढळला. त्यावेळीही त्याने तरुणीला वाईट कृत्य करू दे, नाहीतर दगडाने मारेन, अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
मुलीच्या तक्रारीवरून लागलीच घटनास्थळ गाठले. आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उपस्थित केले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
- अजय आकरे, ठाणेदार, तळेगाव दशासर