अमरावती : व्हॉट्स ॲपवर पाच ते सहा वेळा ‘आय लव्ह यू’ असा संदेश टाकून कुणालाही सांगू नकोस, असे बजावणाऱ्या सख्याहरीला गाडगेनगर पोलिसांनी जेरबंद केले. मो. युसेब मो. इसा (२०, छायानगर, अमरावती) असे अटक केलेल्या सडक सख्याहरीचे नाव आहे.
काही दिवसांपासून त्याने आपला छुपा पाठलाग चालविला आहे. त्यापासून आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याची तक्रार तरुणीने ८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार आसाराम चोरमले यांनी आरोपीला तातडीने अटक केली.
शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीच्या व्हॉट्स ॲपवर आरोपीने ६ ते सात वेळा मॅसेज केले. त्यानंतर त्याबाबत कुणालाही सांगू नको, असा संदेशदेखील पाठविला. १८ डिसेंबर रोजी रात्री ८ नंतर ते संदेश आलेत. त्यावर १९ डिसेंबर रोजी दुपारी २.५५ वाजताच्या सुमारास तो नंबर ब्लॉक करत असताना नंबर कुणाचा म्हणून तरुणीने ट्रुकॉलरवर नाव पाहिले असता, ते मो. युसेब असे डिस्प्लेवर झळकळे.
तक्रारीनुसार, आरोपी हा तरुणीच्या मैत्रीणी, कॉलेजचे प्राध्यापक व ग्रंथालयातून माहिती घेत तिचा छुपा पाठलाग करत असतो. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ च्या दरम्यान तो तिच्या मित्र, मैत्रिणींना महाविद्यालय परिसरात दिसला. आरोपी हा आपल्यावर सतत लक्ष ठेवून पैशाकरिता किंवा जीवे मारण्याकरिता आपला पाठलाग करीत असल्याची भीती तरुणीने व्यक्त केली आहे.
जीवाला धोका, समाजात बदनामी
आरोपीकडृून आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असून, सततच्या पाठलागामुळे आपली महाविद्यालयासह समाजातदेखील बदनामी होत असल्याची फिर्याद तरुणीने नोंदविली. त्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी मो. युसेब मो. इसा याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित तक्रारकर्तीची तक्रार नोंदवून घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित मोबाईल क्रमांक धारकाला तातडीने अटक करण्यात आली.
- आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर