अमरावती : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीचे सर्वस्व हिरावून गेली. मूळच्या परभणी येथील असलेल्या त्या अल्पवयीन मुलीवर हिंगोली बायपास व अमरावतीमधील एका हॉटेलमध्ये अतिप्रसंग करण्यात आला. तिला त्या हॉटेलमध्ये सोडून तो एकटाच रफुचक्कर झाला.
पीडितेची सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपीने चॅटिंग करून फिर्यादीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपी हा त्याच्या चारचाकी वाहनाने फिर्यादीच्या राहत्या घरी परभणी येथे पोहोचला. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तिला कारमध्ये बसवून हिंगोली येथे वाशिम बायपास रोडलगत निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे ‘मैं तुझसे बहोत प्यार करता हूँ, मै तुझसे शादी करुंगा, मुझे तुझसे बच्चा होना, असे म्हणून त्याने वाहनातच तिच्यावर अतिप्रसंग केला. तिला कारने न सोडता त्याने तेथेच तिच्याशी वाद घातला. तिला परभणीच्या एसटीत बसून दिले. त्यानंतरही फोनवरुन सतत लग्नाचे आमिष दाखवून तिला वाशिम बायपासवर नेऊन तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नास नकार देऊन त्याने आपला विश्वासघात केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी अशफाक पठाण अहमद खान (रा. हिंगोली) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), ४१७, व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
अमरावतीत दोन दिवस मुक्काम
आरोपीने २९ एप्रिल रोजी फिर्यादीला संपूर्ण सामान पॅक करायला लावून चारचाकी वाहनाने परभणी येथून अमरावती येथील राजकमल चौकातील एका हॉटेलमध्ये घेऊन आला. तेथेदेखील तिच्याशी अतिप्रसंग करण्यात आला. अमरावतीत दोन दिवस थांबून १ मे रोजी त्याने हॉटेलमधून चेक आउट केले. आपण पुण्याला जाऊन लग्न करू व तेथेच सोबत राहून संसार करू, असे म्हणून त्याने १ मे रोजी दिवसभर कारमधून फिरविले.
संध्याकाळी त्याच हॉटेलसमोर आणून तिला कारमधून उतरू दिले. ‘गुटखा पुडी घेऊन येतो, तू येथेच थांब,’ असे म्हणून तो तेथून निघून गेला. त्यानंतर पीडितेने आरोपीच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क साधला असता त्याने मोबाईल बंद करून ठेवल्याचे लक्षात आले. येथील एक ओळखीची महिला तिला त्या दिवशी घरी घेऊन गेली. लग्नाच्या नावावर आरोपीने आपली लैंगिक फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने २ मे रोजी रात्री शहर कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली.