तिवसा (अमरावती) : अप्पर वर्धाच्या उजव्या कालव्यात गुरुवारी सकाळी पाय घसरून वाहून गेल्याने इसमाचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्याचा मृतदेह घटानस्थळाहून १६ किमी अंतरावर रेस्क्यू पथकाला सापडला.
रामदास कवडे (६८, रा. वरुडा) असे मृताचे नाव आहे. ते गुरुवारी वाहून गेल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले.
कालव्याच्या पाण्याचा प्रवाह व कालव्यात वाढलेल्या काटेरी झाडाझुडपांमळे शोधकार्यात अडचण येत होती. अखेर शुक्रवारी सकाळी पुन्हा स्थानिक महसूल प्रशासनासह रेस्क्यु टीमने शोधकार्य राबविले. घटनास्थळापासून १६ किलोमीटर अंतरावर कालव्यात इसमाचा मृतदेह सापडला. तो मृतदेह पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आला आहे.रेस्क्यू पथकात दीपक डोरस, दीपक पाल, अमोल पवार, विशाल निमकर, देवानंद भुजाडे, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे व गणेश जाधव यांचा समावेश होता.