अमरावती : जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. त्याला त्याच गंभीर स्थितीत दुचाकीवर बसवत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून पळ काढण्यात आला. हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाचा अखेर काही क्षणातच मृत्यू झाला. २७ जून रोजी पहाटे १.१५ ते १.३०च्या सुमारास मेहबूबनगर भागात हा रक्तरंजित थरार घडला. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून तीन हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.
अब्दुल मजिद अब्दुल अजीज (४०, मेहबूबनगर) असे मृताचे नाव आहे. अद्याप खुनामागील कारण स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वैमनस्यातून हा थरार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तक्रारीनुसार, अ. मजिद हे आपल्या कुटुंबासह झोपले असताना सोमवारी पहाटे १.१५ च्या सुमारास तिघांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे ते कुटुंबासह घराबाहेर आले. त्यावेळी बाहेर उभे असलेल्या रियाजखान हाफीजखान (जमियानगर), फिरोज बाली जहीर बाली (रा. नुरनगर) व शब्बीर शाह (रा. मेहबूबनगर) यांनी अ. मजिद याला शिवीगाळ केली. त्यामुळे अन्य काही शेजारीदेखील जागे झाले.
वादादरम्यान आरोपी रियाज खान याने अ. मजिद याच्या पोटावर, मांडीवर व मानेवर चाकूने वार केले. त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. मजिद यांना कुठे घेऊन चालतात, ते गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना दवाखान्यात न्या, अशी आर्जव पत्नीने केली. मात्र, आरोपीने अन्य एका आरोपीसह गंभीर अवस्थेत असलेल्या मजिद याला दुचाकीवर बसविले. व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून टाकून दिले.
सुरक्षा रक्षक स्ट्रेचरकडे, आरोपी फरार
अ. मजिदचा अपघात झाल्याचे सुरक्षारक्षकाला सांगताच तो सुरक्षारक्षक स्ट्रेचर आणण्यासाठी आत गेला. तेवढ्या वेळात आरोपींनी तेथून पळ काढला. पहाटे २ च्या सुमारास उपचारादरम्यान अ. मजिद याचा मृत्यू झाला. हल्ल्याची घटना मृताच्या पत्नीसमक्ष घडली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त एम. एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील व ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली.
तीन दिवसाआड खुनाची हॅटट्रिक
२१ जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास शहर कोतवाली हद्दीत उमेश कोल्हे या व्यावसायिकाचा खून करण्यात आला होता. २४ जून रोजी सायंकाळी बडनेरा ठाण्याच्या हद्दीत अंजनगाव बारी येथे मुरलीधर नांदणे यांची हत्या करण्यात आली. तर आता महबुबनगर येथे रक्तरंजित थरार घडला.
महबूबनगरातील ४० वर्षीय व्यक्तीच्या हत्याप्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत.
- पुंडलिक मेश्राम, ठाणेदार, नागपुरी गेट