अमरावती : दिव्यांग मुलाच्या विवाहासाठी उपवर मुलगी आहे, पण ती गरिबाची असल्याने तिला दीड लाख रुपये द्यावे लागतील, अशी बतावणी करून एक उपवर पित्याला दीड लाख रुपयांनी ठकविण्यात आले. या दोन तासाच्या ‘फेक मॅरेज’साठी तोतया नवरीदेखील उभी करण्यात आली. लग्न झाल्याच्या दोन तासात दीड लाख रुपये घेताच बनावट नवरीसह चौघांनी पळ काढला. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ते ‘फेक मॅरेज’ झाले.
याप्रकरणी वरपित्याच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी २६ एप्रिल रोजी रात्री १२.०९ वाजता असलम मिया शेरूमिया (५०, रा. बेगमबाग कॉलनी, उज्जैन, मध्यप्रदेश), हर्षद दिलिपराव अलोने (३३, कृषक कॉलनी, अमरावती) व दोन महिलांविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पैकी हर्षद अलोने याला अटक करण्यात आली. यातील फिर्यादी वरपिता राजेश केथुनिया हे मध्यप्रदेशातील रतलाम येथील रहिवासी आहे.
तक्रारीनुसार, केथुनिया यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला रतलाम येथे लग्नाकरीता मुलगी मिळत नसल्याने त्यांनी परिचयातील असलम मिया लाला या मध्यस्थाकडे शब्द टाकला. आपल्याकडे मुलगी आहे, मात्र ती गरिबाची असल्याने लग्नासाठी त्यांना दीड लाख रुपये रुपये द्यावे लागतील. असे असलम मियाने सुचविले. मुलासाठी चांगली मुलगी मिळत असेल, तर हरकत नाही, असे सांगून राजेश केथुनिया हे मुलासह काही दिवसांपूर्वी अमरावतीत पोहोचले. असलम मिया देखील अमरावतीत पोहोचला.
असलम मिया याने केथुनिया यांची स्थानिक हर्षद अलोने याच्याशी ओळख करून दिली. अलोनेच्या ओळखीतून २२ एप्रिल रोजी खंडेलवाल नगर येथील एका सदनिकेत केथुनिया यांचा मुलगा व तोतया नवरीचा साध्या समारंभात विवाह झाला. वधुवरांनी एकमेकांच्या गळ्यात हार टाकल्यानंतर केथुनिया यांनी नव्या सुनेच्या हाती १.५० लाख रुपये दिले. यावेळी अलोनेच्या ओळखीतील एक महिला देखील तेथे उपस्थित होती.
असा झाला भंडाफोड
दरम्यान, ती रक्कम आईच्या बॅक खात्यात ट्रान्सफर करून येते, अशी बतावणी करून तोतया नवरी २२ ला सायंकाळी त्या फ्लॅटमधून बाहेर पडली. तिच्यासोबत असलम मिया, हर्षद अलोने देखील बाहेर पडले. सायंकाळी सातच्या सुमारास असलम मिया फ्लॅटवर परतला. नवरीने दुचाकीहून उडी मारून पळ काढल्याची माहियी त्याने केथुनिया यांना दिली. जड अंतकरणाने केथुनिया पितापुत्राने अमरावती सोडले. मात्र, झालेली फसवणूक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी २६ एप्रिल रोजी रात्री बडनेरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.याप्रकरणी वरपित्याच्या तक्रारीवरून दोन महिलांसह दोन पुरूषांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पैकी हर्षद अलोने याला अटक केली.
बाबाराव अवचार, ठाणेदार, बडनेरा