शिवाजीनगरवासी गहिवरले : विधिवत अंत्यसंस्कार, पोलिसांना कळविले लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : स्थानिक शिवाजीनगरात एका मनोरूग्णाने चाकुने भोसकून कुत्र्याचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाजीनगरातील नागरिकांनी या घटनेबद्दल प्रचंड हळहळ व्यक्त केली. गंभीर जखमी अवस्थेतील त्या कुत्र्यावर पुरेपूर उपचारही केले. मात्र, उपयोग झाला नाही. अखेर शिवाजीनगरवासीयांनी त्यांच्या लाडक्या ‘काली’ कुत्र्याला विधिवत अंत्यसंस्कार करून निरोप दिला. संपूर्ण शिवाजीनगरातील लोकांचा लाडका ‘काली’ मोहल्ल्याचे संरक्षण करीत असे. परंतु ७ मे रोजी मध्यरात्री एका मनोरूग्ण व्यक्तीने चक्क चाकूने भोसकून कालीला गंभीर जखमी केले. नागरिकांनी एकत्र येऊन कालीला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. रात्री दीड वाजता डॉक्टरांनी त्याच्यावर उपचारही केले. परंतु गंभीर जखमी असल्याने बारा तासांनंतर कालीने अखेरचा श्वास घेतला. नागरिकांना लाडका काली दगावल्याने शोक अनावर झाला. नागरिकांनी एकत्र येऊन कालीच्या विधिवत अंत्यसंस्काराची तयारी केली आणि केदारेश्वर मोक्षधामालगत त्याचा दफनविधी केला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पशुवैद्यकीय अधिकारी सरोदे आणि खेरडे यांनी त्याच्यावर उपचार केले. कालीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी केदारेश्वर मोक्षधाममध्ये बाबाराव मडघे, सचिन परिहार, रुपेश खासबागे, सुरज उईके, सचिन आंजिकर, अमर कठाणे, कृष्णा वऱ्हेकर, मयुरेश खासबागे, अक्षय वानखडे, महेश पाचघरे, मंगेश बोराडे, नीलेश कट्टा, मंगेश बेलसरे आदींची उपस्थिती होती. कुत्र्याचा खून करणाऱ्या मनोरूग्णावर कारवाईची मागणी केली जात आहे.
मनोरूग्णाने चाकूने भोसकून केली कुत्र्याची हत्या
By admin | Published: May 10, 2017 12:11 AM