अमरावती : आजकाल लग्न असो वा रिसेप्शन, वऱ्हाड्यांच्या नाचण्याशिवाय होतच नाही. त्या नाचण्याच्या नादात लग्न दोन तास उशिरा लागले तरी चालेल, मात्र हौसेला मोल नसल्याची ती पावती ठरली आहे. असाच एक प्रकार नांदुरा लष्करपूर येथे घडला. तेथे रिसेप्शनमध्ये नाचू दिले नाही, त्यामुळे नाराज झालेल्या तरूणाने नवरदेवाच्या भावावर तलवार चालविली.
१७ जून रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी माहुली जहांगिर पोलिसांनी नवरदेवाच्या बहिणीच्या तक्रारीवरून आरोपी तेजस सुनिल तायडे (२३, अमरावती) याच्याविरूध्द १८ जून रोजी पहाटे सहाच्या सुमारास खुनाचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम व ॲट्रासिटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. तथा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नांदुरा लष्करपूर येथे १७ जून रोजी रात्री एका तरूणाच्या लग्नाचे रिसेप्शन होते. रात्री ७ वाजतापासून वऱ्हाड्यांची रेलचेल होती. रात्री ११ वाजता रिसेप्शन शेवटच्या टप्प्यात आले. त्यावेळी आरोपी तेजस तायडे (२३) याने रिसेप्शनदरम्यान नाचण्याचा आग्रह धरला. मात्र, नवरदेवाकडील मंडळीने आता रात्र झाली, आता नाचगाणे नको, म्हणून त्याला नकार दिला. त्यामुळे तो रागारागात गावातील घरी पोहोचला व तलवार घेऊन रिसेप्शनमध्ये परतला. मला नाचू दिले नाही, म्हणून त्याने नवरदेवाच्या भावावर तलवारीने वार केले. त्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली. रंगाचा भंग झाला. रडारड व धावाधाव सुरू झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला अडवून पुढील अनर्थ टाळला.
नांदुरा लष्करपूर येथील रिसेप्शनमध्ये ती घटना घडली. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
- मिलिंद सरकटे, ठाणेदार, माहुली