अमरावती : राज्यात सर्वाधिक वाघ हे विदर्भात आहेत. मात्र, आता व्याघ्र प्रकल्पातील वाघांना क्षेत्र कमी पडत असून, ताडोबा-अंधारी, बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे ‘आउटगोईंग’ सुरू झाले आहे. त्यामुळे यवतमाळ, पांढरकवडा, वणी, नागपूर, वर्धा, अमरावतीच्या जंगलात वाघांची भ्रमंती ही मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी मानली जात आहे.
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री अभयारण्य आहे. अलीकडे नांदेड, किनवट, पांढरकवडा, वणी या भागातही वाघांची भ्रमंती होत असल्याने भविष्यात या परिसरात मानव-वन्यजीव संषर्घ होण्याची दाट शक्यता आहे. पैनगंगा (किनवट), टिपेश्वर (पांढरकवडा), ताडोबा-अंधारी (चंद्रपूर) असा वाघांचा भ्रमंती मार्ग असल्याचे वन्यजीव विभागाने अधोरेखित केले आहे.
नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा वाघांचे कॉरिडॉर हे जागतिक वन्यजीव अनुदान संस्थेकडून मंजूर करण्यात येते. त्यानंतर वाघांच्या कॉरिडॉर व्यवस्थापनासाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून अनुदान प्राप्त होते. त्यानुसार विदर्भ-मराठवाडा असा वाघांचा नव्या कॉरिडॉरचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच ताडोबा- अंधारी, टिपेश्वर, काटेपूर्णा, पैनगंगा या चार अभयारण्य कॉरिडॉरच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ मध्य प्रदेशात मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा दऱ्या-खोऱ्यांत वसलेला असून जंगल वैभवसंपन्न आहे. तथापि, येथील वाघ हे मध्य प्रदेशातील खरगौन जंगलापर्यंत आवागमन करतात. रानगवा, काळवीट, हरीण, रानडुक्कर या वन्यजीवांची शिकार करून वाघ उपजीविका भागवितो. मेळघाटात ३० ते ४० वाघ असल्याची नोंद आहे. दऱ्या, खोऱ्यांच्या जंगलामुळे वाघ हे क्वचितच व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडतात. मात्र, लगतच्या मध्य प्रदेशात वाघांचे आवागमन होत असल्याची माहिती आहे.
व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे आवागमन वाढले हे खरे आहे. पण ते मानवासाठी धोकादायक ठरताहेत असे म्हणता येणार नाही. किंबहुना एखाद्या वाघाने मनुष्यावर हल्ला केला, असा अहवाल विभागीय वन कार्यालयातून प्राप्त झाल्यास त्याला नियमानुसार रेस्क्यू पथकाद्वारे जेरबंद करण्यात येते. वाघांच्या नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरी मिळविली जाते.
- महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर