अमरावती : ‘तू आमच्याच हाताने मरणार’ असे म्हणत रोहित ऊर्फ नादो विजय भोंगळे (२५) या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले होते. त्याला गंभीर अवस्थेत एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, घटनेच्या चार दिवसानंतर नादोचा मंगळवारी सकाळी ११.५५ च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी मुळ गुन्ह्यात कलम ३०२ ची वाढ केली आहे. या हल्ल्यात त्या तरुणाची बहीणदेखील जखमी झाली होती.
९ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास बेनोडा येथील पंचशील झेंड्याजवळ ही घटना घडली होती. शुक्रवारी रात्री नादो हा अंगणात असताना प्रवीण बन्सोड, रूपेश बन्सोड आणि अनिल जोंधळे तसेच एक अनोळखी इसम असे चार जण त्याच्या घरात चाकू घेऊन शिरले. येताना चौघांनी ‘नादो, आता तुला सोडणार नाही, तू आमच्या हाताने मरणार’ असे म्हणून जोरजोराने शिवीगाळ केली. चौघांनी मिळून नादोवर चाकूने वार केलेत. त्यांनी नादोच्या पाठीवर, डोक्यावर, पोटावर चाकूने वार करून त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते. त्याला तातडीने त्याच दिवशी कॉंग्रेसनगर मार्गावरील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे तो मृत्युशी झुंज देत होता. डॉक्टरांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, मंगळवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.५५ च्या सुमारास नादोने शेवटचा श्वास घेतला.
आमच्याच हाताने मरणार म्हणत, तरूणाला चाकूने भोसकले; गुन्हा दाखल
वाढीव पोलीस कोठडी याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण ऊर्फ पिंटू भीमराव बनसोड (३९), रूपेश भीमराव बनसोड (४२, दोघेही रा. बेनोडा जहागीर), अमोल जोंधळे (३८, रा. भीमटेकडी) व सै. नाजिल सै. सत्तार (३२, राहुलनगर) यांच्याविरुद्ध १० डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता गुन्हा दाखल केला. फ्रेजरपुरा ठाण्यातील पोलीस निरिक्षक (गुन्हे) नितीन मगर यांनी त्याचदिवशी सायंकाळी चौघांनाही अटक केली. दरम्यान, मंगळवारी चौघांचीही पोलीस कोठडी संपत असताना नादोचा मूत्यू झाल्याने त्यांच्यावरील लावण्यात आलेल्या गुन्ह्यात खुनाची कलम वाढविण्यात आली. त्यामुळे मंगळवारी दुपारी वाढीव पोलीस कोठडी मागण्यात आली.