देवेंद्र भुयार, अटल जल योजनेची बैठक, वरूड तालुक्यातील ८६, मोर्शी तालुक्यातील ७७ गावांचा समावेश
वरूड : वरूड तालुक्यातील ८६ गावांचा व मोर्शी तालुक्यातील ७७ गावांचा अटल जल योजनेत समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये भूजल पातळीत वाढ होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी व या योजनेवर विचार विनिमय करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली वरूड येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भूजल साक्षरता अभियान व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘चित्ररथ’चे आयोजन करण्यात आले होते. या चित्ररथाच्या साहाय्याने संपूर्ण राज्यात जलसंधारणासाठी विविध उपाययोजनांबाबत माहिती देण्याचा एक चांगला उपक्रम आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. वरूड, मोर्शी तालुक्यातील भूजल पुनर्भरणाची मर्यादा लक्षात घेता, भूजल उपशावर मागणी आधारित व्यवस्थापनाद्वारे नियंत्रण आणणे अधिक उपयुक्त असल्याने अटल भूजल (अटल जल) योजनेत वरुड तालुक्यातील ८६ गावांमध्ये व मोर्शी तालुक्यातील ७७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील पाणलोट क्षेत्रामध्ये अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करून भूजलाच्या शाश्वत विकासाकरिता व्यवस्थापन आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विभागांच्या माध्यमातून माहिती संकलित करणे व प्रत्येक गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जल अर्थसंकल्प व जलसुरक्षा आराखडे त्वरित करणेकामी गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांनी जलसुरक्षा आराखडे करण्याबाबत तसेच आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले.
आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू कोहळे, बाबा इंगळे, गुड्डु श्रीराव, गुड्डु पेलागडे यांच्यासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, गटविकास अधिकारी, उपअभियंता (जल संपदा विभाग), उपअभियंता (जलसंधारण), उपअभियंता (लघु सिंचन), वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.