विद्यापीठ ते तपोवन मार्गावरील घटना : बजरंग दलाच्या पुढाकाराने कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हुक्का पार्लर बंदचे आदेश असतानाही शहरात हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. दोन दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने कठोरा मार्गावरील काफिला हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी रात्री गाडगेनगर पोलिसांनी कस्बा हुक्का पार्लरवर धाड टाकली. गाडगेनगर पोलिसांनी आरोपी संचालक गौरव खंडेलवाल व मॅनेजर तिवारी या दोघांना अटक केली आहे. या हुक्का पार्लरमधून पोलिसांनी २२ हुक्का पट व अन्य फ्लेवरचे डब्बे जप्त केले. बसस्थानक ते रेल्वेस्थानक मार्गावरील अड्डा-२७ मध्ये हुक्का पार्लर व डॉन्स पार्लर सुरू असल्याचे सर्वप्रथम बजरंग दलाला आढळून आले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी अड्डा-२७ ची झडती घेतली होती. हुक्का पार्लर संस्कृतीत अमरावती रुजू होत असल्याचे पाहून बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हुक्का पार्लर संस्कृती बंद करावी, यासाठी बजरंग दलाने प्रशासनास वेठीस धरले होते. सहायक कामगार आयुक्त कार्यालयात ठिय्या देऊन हुक्का पार्लरचालकाविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही रेटून धरली होती. त्याअनुषंगाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत शहरातील चार हुक्का पार्लरची नोंदणी रद्द करण्यात आली आणि अड्डा-२७ व कसबा कॅफेची नोंदणी रद्द करून नोंदणीधारकाविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी हुक्का पार्लर बंदचे फर्मान सोडले होते. त्यामुळे काही दिवस शहरात हुक्का पार्लर बंद असल्याचेही आढळून आले. मात्र, दोन दिवसांपूर्वीच कठोरा मार्गावरील काफिला कॅफे अॅन्ड रेस्टांरटमधील हुक्का पार्लरचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. संचालकासह एकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती. मात्र, गुरुवारी विद्यापीठ ते तपोवन मार्गावरील कसबा कॅफेमध्ये हुक्का पार्लरवर धाड टाकल्यानंतर शहरात हुक्का पार्लर छुप्या मार्गाने सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हुक्का पार्लर चालविणाऱ्यांना पोलिसांचेसुध्दा अभय असल्याचे आढळून आले आहे. व्हेंटिलेटर, खिडकीसुद्धा नाहीगाडगेनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्यासह अन्य पोलिसांनी कस्बा हुक्का पार्लरवर धाड टाकली. पोलिसांनी हुक्का पार्लरच्या जागेची पाहणी केली असता त्या ठिकाणी हवा जाण्यासाठी मार्गच नसल्याचे आढळून आले. खिडकी नाही व व्हेंटिलेटरची सोयच नसल्याचे दिसून आले. दम-मारो दम करणारी तरुणाई हुक्का फ्लेवरच्या धुरामध्ये गुरफटलेले पोलिसांना आढळून आले. हुक्क्यात तंबाखुजन्य पदार्थ असून त्यातून निघाणाऱ्या धुराचा आरोग्यावर घातक परिणाम होते. मात्र, हुक्का पार्लर चालविणाऱ्या संचालकांनी ग्राहकाच्या आरोग्याशी खेळच सुरु ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. बजरंग दलाने केला पर्दाफाशशहरातून हुक्का पार्लर संस्कृती हद्दपार करण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ता सातत्याने प्रयत्न करीत आहेत. कसबा कॅफेमध्ये हुक्का पार्लर सुरुअसल्याची भनक पदाधिकाऱ्यांना लागली होती. त्या अनुषंगाने बजरंग दलाचे प्रवीण गिरी, निरंजन दुबे, बिपीन गुप्ता, अमोल चौधरी, राजू दुबे, पवन श्रीवास, सुमित साहू, ड्युक्स गोधवानी, नितांशू इटोरिया, सिध्दु सोळंकी, दुर्गेश ठाकुर, त्रिदेव डेंडवाल, शिवम बिंडा, अमन धनवानी, विजू खडसे, बंटी पारवानी आदी कार्यकर्त्यांनी कस्बावर गुरुवारी रात्री धाड टाकली. त्यावेळी संचालकासह तेथील हुक्का दम लावणाऱ्या ग्राहकांची ताराबंळ उडाली. दरम्यान पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.
कसबा हुक्का पार्लरवर धाड संचालकासह मॅनेजर अटकेत
By admin | Published: June 23, 2017 12:12 AM