गणेश वासनिक
अमरावती - धनप्राप्ती होत असल्याच्या अफलातून कारणांनी वापरला जाणारा मांडूळ (दुतोंड्या) साप तस्करांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना वनविभागाच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्पमित्रांवर लक्ष ठेवण्याचे कळविले आहे. त्याअनुषंगाने वन विभाग ‘अलर्ट’ झाला असून, मांडूळ सापाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्याचे सर्वश्रूत आहे.
राज्याच्या वन्यजीव विभागाला मिळालेल्या गुप्तचर माहितीनुसार, मांडूळ सापाची तस्करी वाढली आहे. या तस्करीत अप्रत्यक्षरीत्या सर्पमित्रांचा सहभाग असल्याचे बोलले जाते. त्यामुळे वनविभागाला जंगलासह सर्पमित्रांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. गतवर्षी अकोट येथे मांडूळाची तस्करी करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळची येथील दीपक रामचंद्र साळुंखे (३२) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून चार फूट लांब व दोन किलो वजनाचा मांडूळ साप जप्त करण्यात आला. तो साप १२ लाख रुपयांत विक्री केला जाणार होता, असे वनविभागाने नोंदविलेल्या बयाणातून स्पष्ट झाले. त्यानंतर यादोघांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन वनविभागाने सोडले. पिसुळी येथील एका शेतातून दुर्मिळ मांडूळ साप पकडून त्याची इतरत्र तस्करी केली जात होती, असे पोलिसांच्या तपासाअंती पुढे आले. त्यामुळे वनविभागाने या सापाच्या तस्करीप्रकरणी राज्यात वन विभागाला ‘अलर्ट’ राहण्याबाबतचे सूचना दिल्या आहेत.
सापांचे ‘मॉनिटरींग’ नाही
वनविभागात सापाचे ‘मॉनिटरिंग’ नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ सर्पमित्रांचे सोशल मीडियावर ग्रूप आहे. सर्पमित्राने कोणत्या प्रजातीचा साप पकडला आणि जंगलात सोडला, हे व्हॉट्अपवर कळते. मात्र, यासंदर्भात वन विभागाकडे अधिकृतपणे नोंदी राहत नाही. एकूणच सापांचे ‘मॉनिटरिंग’ पासून वनविभाग अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मांडूळ सापाची तस्करी वाढल्याचे वास्तव आहे.
गुप्तधन शोधण्यासाठी केला जातो वापर
मांडूळ साप हा गुप्तधन शोधण्यासाठी वापरला जात असल्याची माहिती मिळाली आहे. वनविभागाचा नोंदी हा प्रकार अंधश्रद्धेचा असला तरी अनेक वर्षांपासून दुतोंड्या सापाची मागणी वाढतच आहे. ज्या भागात गुप्तधन असते, त्या परिसरात हा साप सोडल्यास तो त्याच भागात शिरतो आणि गुप्तधनाचे स्थळ निश्चित करतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मांडूळ साप हा दुर्मिळ आहे. तो विदर्भात फार कमी आढळून येतो. वरिष्ठांकडून दक्ष राहण्याच्या सूचना मिळाल्या असून, काहींवर गोपनीयरीत्या पाळत ठेवली जात आहे.
- अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, वन विभाग, अमरावती