अमरावती : कोरोनाने मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील २२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. सदर घटना सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पोलीससूत्रानुसार, अंजनगाव बारी येथील फिर्यादी २० वर्षीय मुलाने पोलिसांत तक्रार नोंदविली. फिर्यादी यांची ६४ वर्षीय आईचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ३ मे रोजी सुपर स्पेशालिटीच्या कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान २० मे रोजी त्या दगावल्या. त्यामुळे त्यांचे प्रेत अंत्यविधीकरिता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, मृताच्या गळ्यात २२ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र नातेवाईकाच्या ताब्यात दिले नाही. त्यामुळे नातेवाईक संतापले सदर मंगळसूत्र अज्ञात आरोपीने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भादंविचे कलम ४०४, ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. यापूर्वीसुद्धा कोविड रुग्णालयातून मोबाईल, बॅग व इतर साहित्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता मृताच्या गळ्यातील मंगळसूत्रच लंपास केल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.
कोट
कोविड रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येतील. अशाप्रकारे चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल.
- आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर