नरेंद्र जावरे
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या नोकरभरती प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्यापूर्वीच ते शहरातून पसार झाले आहेत. ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित होताच सहकारक्षेत्रात खळबळ उडाली. दुसरीकडे अचलपूर पोलिसांनी सहायक सचिव मंगेश भेटाळू याच्या संगणकाची हार्ड डिस्क चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने त्यात दडलंय काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यातून मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, बेपत्ता संचालक मंडळ अटकपूर्व जामिनासाठी धडपडत असल्याची माहिती आहे.
नोकरभरती प्रकरणात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावरून अचलपूर पोलिसांनी संबंधित सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला, लता वाजपेयीसह नोकरभरती राबविणाऱ्या केएनके कंपनीच्या संचालकांविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले होते. तिघांनी अटकपूर्व जामीन आणला. केएनके टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या योगेश महादेव खंडारे व गौरव नारायण वैद्य या दोन्ही संचालकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या भरतीसंदर्भात संबंधित कृषिउत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावरसुद्धा कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली होती.
बॉक्स
डीडीआरचे पत्र, संचालकांची भागमभाग
अचलपूर पोलीस या संपूर्ण नोकरभरती प्रकरणाचा तपास करीत असताना, त्यासंदर्भात त्यांनी संबंधित विविध कार्यालयांना पत्रव्यवहार केला. संबंधित सर्व संचालक मंडळाचे बयानसुद्धा नोंदविले. जिल्हा उपनिबंधक यांच्या अधिनस्थ बाजार समिती असल्याने नोकरभरतीसंदर्भात विचारणा करण्यात आली होती. त्यामध्ये डीडीआर यांनी फौजदारी कारवाईसंदर्भात निश्चित सांगता येत नाही. सदर कामकाज बाजार समिती स्तरावरील असल्याचे स्पष्ट करतानाच संचालकांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
बॉक्स
मंगेशच्या संगणकात काय?
निलंबित सहायक सचिव मंगेश भेटाळूविरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित कागदपत्रे व त्याचे संगणक (हार्ड डिस्क) ताब्यात घेऊन नागपूर येथे तपासणीसाठी पाठविल्याची माहिती आहे. त्यामध्ये अखेर दडलंय काय, याची चर्चा सुरू आहे. मोठे घबाड उघड होण्याच्या भीतीने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पोलिसांना वेगळा गुन्हा दाखल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट झाले असून, सहभाग दिसताच १२० बी व ३४ अन्वये अटकेची टांगती तलवार संचालक मंडळावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.