दहावीतही मुलीच : सामराची प्रियल, मोर्शीची संपदा, शिरजगावचा प्रसाद संयुक्तपणे द्वितीय लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. शहरातील मणीबाई गुजराती हायस्कूलची विद्यार्थिनी कल्याणी पुरूषोत्तम धावडे हिने ९८.४० टक्क्यांसह (क्रीडा गुण वगळून) जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. कल्याणीला एकूण ४९२ गुण मिळाले आहेत. तर भंवरीलाल सामरा हायस्कूलची विद्यार्थिनी प्रियल सराफ, मोर्शी येथील शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी संपदा आजनकर आणि चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील बालमुकुंद राठी विद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद इंगळे या तिघांनी ५०० पैकी ४९० गुणांसह ९८ टक्केवारी मिळवून जिल्ह्यातून संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याच्या दहावीच्या निकालावर यंदा देखील मुलींचाच वरचष्मा आहे. जिल्ह्याला टॉपर देणाऱ्या मणिबाई गुजराती हायस्कूलचा निकाल ९५.७१ टक्के लागला आहे. तर भंवरीलाल सामरा इंग्लिश हायस्कूलने यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून या शाळेचा निकाल ९९.१७ टक्के लागला आहे. १२१ विद्यार्थ्यांपैकी १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गेल्या वर्षी याच शाळेची विद्यार्थिनी प्राची उदासी हिने जिल्ह्यातून अव्वल क्रमांक पटकावला होता. विद्यार्थ्यांना शाळेतूनच योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने यंदाही यशाची परंपरा कायम राखता आली, असे मत भंवरीलाल सामरा विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन राठी यांनी व्यक्त केले. शहरातील अरूणोदय शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे ज्ञानमाता हायस्कूल ९६.४५, समर्थ हायस्कूल ९७.२७, होलिक्रॉस कॉनव्हेंट इंग्लिश हायस्कूल १०० टक्के, नारायणदास लढ्ढा हायस्कूल ९८.३८ टक्के, मनपा उर्दू हायस्कूल ९७.८२, तखतमल इंग्लिश हायस्कूल ९७.८८, सेंट फ्रान्सिस हायस्कूल ९९.३० टक्के निकाल लागला आहे.कल्याणीला व्हायचेय आयएएसअमरावती : माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश संपादन करणारी मणिबाई गुजराती हायस्कूलची विद्यार्थिनी कल्याणी धावडे हिला भविष्यात आयएएस, आयपीएस होऊन देशसेवा, समाजसेवा करायची आहे. कल्याणीने दहावीच्या परीक्षेत ९८.४० टक्के गुण प्राप्त केले आहेत. जिल्ह्यातून प्रथम येण्याची बातमी कळताच उत्साहाने ओथंबलेली कल्याणी ‘लोकमत’शी भरभरून बोेलली. ती म्हणाली दररोज दोन तास चिकाटीने अभ्यास, नियमित ट्यूशन क्लासेस, शाळेत एकाग्रतेने लक्ष देणे, यामुळेच हे यश मिळू शकले. कल्याणीचे वडील शहरातील बोके प्रिंटर्समध्ये कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य असलेल्या कल्याणीला भविष्यात खूप अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जायचे आहे. त्यासाठी सद्यस्थितीत ती ‘आयआयटी’चा अभ्यास करीत असून यातून सायन्स व्होकेशनलला जाऊन व अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुढे स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचा मानस आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती आई-वडिल, शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांसह शिकवणीवर्गाच्या संचालकांना देते.
मणीबाईची कल्याणी प्रथम
By admin | Published: June 14, 2017 12:02 AM