अमरावती : बनावट प्रतिज्ञालेखाच्या आधारे फेरफार करून एका ७० वर्षीय वृद्धाची फसवणूक करण्यात आली. २९ एप्रिल २००२ रोजी झालेल्या या व्यवहाराप्रकरणी जेएमएफसी न्यायालयाच्या आदेशाने शहर कोतवाली पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी आठ जणांविरूद्ध फसवणूक व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. चंद्रकांत विठ्ठल मामर्डे (७०, रा. पटवीपुरा) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.
चंद्रकांत मामर्डे यांच्या नावे मौजे वनारसी येथे १ हेक्टर ४ आर शेतजमीन आहे. आरोपींनी २९ एप्रिल २००२ रोजी खोट्या सह्या करून चूक दुरूस्ती लेख तयार केला. त्या दस्ताच्या आधारे १५ जून २००२ रोजी फेरफार घेण्यात आला. वाटणीपत्र करून मामर्डे यांची फसवणूक करण्यात आली. त्याबाबत त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक ११ यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशाने शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी राजकुमार मामर्डे (५६), प्रशांत काजे (४५), संजय श्रीराव (५५), जयकुमार मामर्डे (२५), विजय मामर्डे (२४), रोहण पांढरे (२६ सर्व रा. अमरावती), एक अज्ञात व एक महिला अशा एकूण आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड हे पुढील तपास करीत आहेत.